वृत्तसंस्था/ ओडेनेसी (डेन्मार्क)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या डेन्मार्क खुल्या सुपर 750 दर्जाच्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही. सिंधूचे महिला एकेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. स्पेनच्या कॅरोलिना मॅरिनने सिंधूचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. या उपांत्य सामन्यावेळी दोन्ही खेळाडूंकडून शाब्दिक चकमकी वारंवार घडल्याने दोघींनाही पिवळे कार्ड पंचांनी दाखविले.
शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात स्पेनच्या मॅरिनने पीव्ही. सिंधूचा 21-18, 19-21, 21-7 अशा गेम्स्मध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना 75 मिनिटे चालला होता. उभय खेळाडूंमध्ये आतापर्यंत झालेल्या लढतीमध्ये सिंधूचा मॅरिनकडूनचा हा पाचवा पराभव आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तसेच 2018 च्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत अंतिम फेरीत मॅरिनने सिंधूला पराभूत केले होते. महिला बॅडमिंटनपटूंच्या एकेरीच्या मानांकनात स्पेनची मॅरिन सध्या सहाव्या तर सिंधू बाराव्या स्थानावर आहे. हा सामना सुरु झाल्यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी उडाल्याने पंचांनी त्यांना समज दिला होता. पण त्यानंतरही त्यांच्याकडून याची पुनरावृत्ती झाल्याने पंचांनी दोन्ही खेळाडूंना अखेर पिवळे कार्ड दाखविले. पहिल गेम जिंकल्यानंतर मॅरिनने आपला जल्लोष कोर्टवर साजरा केला होता. पीव्ही. सिंधूने गेल्या आठवड्यात झालेल्या आर्किटीक खुल्या सुपर 500 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.