‘कॉम्रेड मॅरेथॉन’मध्ये यशाला गवसणी : नाधवडेचे अरविंद सावंत पदकाचे मानकरी
सावंतवाडी/अनुजा कुडतरकर
कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सिंधुदुर्गातील स्पर्धकाने सहभागी होणे, हेच मुळात कौतुकास्पद असते. त्यातच सिंधुदुर्गवासीय खेळाडूने जागतिक पातळीवरील हजारो प्रशिक्षित खेळाडूंवर मात करून यश खेचून आणणे, स्पर्धेतील विजेत्याचे पदक भारताच्या नावे करणे, हे म्हणजे अभिमानाचा टिळा ललाटी लावून मिरविण्याइतके अभिमानास्पद असते. वैभववाडीतील पेशाने अध्यापक असणाऱ्या अरविंद रमाकांत सावंत यांनी गुंफलेली यशमाला या जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी लक्षवेधी ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड मॅरेथॉन’मध्ये त्यांनी 9 तास 21 मिनिटांत 90 किलोमीटरचे अंतर पार करून त्यांच्या वयोगटात भारतातून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
दक्षिण आफ्रिकेत नुकतीच जगातील सर्वात अवघड समजली जाणारी 90 किमी अंतराची ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली. स्पर्धेत पदक पटकावलेल्या एका सिंधुदुर्गच्या सुपुत्राची देदीप्यमान कामगिरी ही सिंधुदुर्गासाठी संस्मरणीय ठरली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे हे एक गाव. ‘कॉम्रेड मॅरेथॉन’मध्ये या गावातील सरदारवाडीचे सुपुत्र अरविंद रमाकांत सावंत (52) यांनी 9 तास 21 मिनिटांत 90 किलोमीटरचे अंतर पार करून सिंधुदुर्गचे नाव सातासमुद्रापार उंचावले आहे. त्याचबरोबर त्यांच्या वयोगटातून त्यांनी भारतातून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जगातील सर्वात खडतर समजल्या जाणाऱ्या मॅरेथॉनपैकी एक असलेली ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ ही स्पर्धा दरवर्षी दक्षिण आफ्रिकेतील जवानांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते. जगभरातील 129 देशांमधील धावपटू या स्पर्धेत भाग घेतात. यावर्षी या स्पर्धेत जगभरातून 24 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी भारतातून 400 धावपटू पात्र ठरले. यावर्षी 8 जून रोजी ही मॅरेथॉन स्पर्धा झाली. दक्षिण आफ्रिकेतील ‘पीटर मेरीसबर्ग’ व ‘डर्बन’ या दोन शहरातून ‘डाऊनरन्स मॅरेथॉन’ घेण्यात आली. यावर्षी 90 किलोमीटरचे अंतर ‘कॉम्रेड मॅरेथॉन’मध्ये पार करायचे होते. अरविंद सावंत यांनी 9 तास 21 मिनिटांत हा 90 किलोमीटरचा पल्ला पार करून दक्षिण आफ्रिकेत सिंधुदुर्गचा झेंडा रोवत ‘Rदूं श्tsप्aत्ग्’ पदक पटकावले.
जिद्द, सराव आणि परिश्रमामुळे यश
डिसेंबर महिन्यापासून सरावाला सुऊवात केली. स्पर्धेच्या आधी सहा महिने 1400 ते 1500 किलोमीटर धावण्याचा सराव केला. या सहा महिन्यांत आहारातून जंक फूड आणि थंड पेय पूर्णपणे टाळले, असे ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ स्पर्धेतील उपविजेते अरविंद सावंत यांनी ‘तऊण भारत संवाद’शी बोलताना सांगितले. दक्षिण आफ्रिकेत ‘कॉम्रेड मॅरेथॉन’मध्ये पळताना भारतीय ध्वजाचा ‘लोगो’ असलेले टी-शर्ट घालून धावताना अभिमान वाटला. कारण, त्या स्पर्धेवेळी आम्हाला ‘चिअर अप’ करायला दक्षिण आफ्रिकास्थित भारतीय नागरिक उपस्थित होते. त्यामुळे हुरूपही वाढला. भारतासाठी आपण पळतोय, ही अभिमानास्पद भावना होती, असे मत सावंत यांनी व्यक्त केले. दरम्यान, या ‘मॅरेथॉन’साठी अरविंद रमाकांत सावंत यांनी प्रचंड मेहनत घेत कसून सराव केला. या वयातील त्यांचे उत्कृष्ट नियोजन त्यांना यशापर्यंत घेऊन गेले.
कोरोना काळात मॅरेथॉनकडे वळले….
अरविंद सावंत हे पेशाने शिक्षक आहेत. वैभववाडी तालुक्यातील केईएम हायस्कूल येथे ते अध्यापनाचे कार्य करतात. कॉलेज जीवनापासूनच त्यांचा ‘फिटनेस’कडे कल होता. त्यानंतर कोविड काळात त्यांनी ‘मॅरेथॉन’मध्ये धावायला सुऊवात केली. आतापर्यंत त्यांच्या 100 मॅरेथॉन पूर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे, अरविंद सावंत यांनी कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ यशस्वीपणे पार केली आहे. त्याचबरोबर मॅरेथॉनकडे वळणाऱ्या भावी धावपटूंनादेखील ते मार्गदर्शन करीत असतात. सिंधुदुर्गातून जास्तीत जास्त धावपटू तयार झाले पाहिजेत, असा आपला मानस आहे, असे सावंत यांनी सांगितले.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून धावपटूंसाठी सिंधुदुर्ग हे सर्वोत्तम ठिकाण ठरत आहे, हे उल्लेखनीय आणि गैरवास्पद आहे. त्यामुळे ‘कॉम्रेड मॅरेथॉन’मध्ये सिंधुदुर्गातून सहभाग वाढण्याबरोबरच ही स्पर्धा यशस्वी करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. गेल्या वर्षी सावंतवाडी येथील धावपटू ओंकार पराडकर आणि प्रसाद कोरगावकर यांनीदेखील या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत पदक पटकावले होते. ‘कॉम्रेड मॅरेथॉन’मध्ये तसेच अशा प्रकारच्या अन्य स्पर्धांमध्येही सिंधुदुर्गातून सहभागी होणाऱ्या, त्याचबरोबर पदकांची लयलुट करणाऱ्या स्पर्धकांची संख्या अशीच दिवसेंदिवस वाढत गेली तर, सिंधुदुर्ग जिल्हा ‘धावपटूंचा हब’ बनेल, यात शंकाच नाही.









