टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने अटीतटीच्या लढतीत साऊथ आफ्रिका संघावर मात करत जगज्जेतेपद मिळविले. भारतीय संघावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. भारतीय संघाचा विजय ज्यामुळे झाला ते कठीणतम कॅच सूर्यकुमार यादव याने घेतले. या एका कॅचमुळे सामना फिरला आणि भारतीय संघाचा विजय सोपा झाला. याच सूर्यकुमार यादवने बालपणी ज्यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरविले, ते कोच अशोक आस्वलकर मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-कालावल येथील. खेळाडू म्हणून अशोक आस्वलकर यांच्या क्रिकेट कारकीर्दीची सुऊवात मालवण येथून प्ले बॉईज संघाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर मी मुंबई येथे गेलो. मात्र, वाढते वय पाहता क्रिकेट खेळाडू म्हणून मोठी कारकीर्द राहणार नाही, हे लक्षात आले आणि वयाच्या 35 व्या वर्षी क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले.
अशोक आस्वलकर सांगतात, बी. ए. आर. सी. कॉलनीत क्रिकेट अकॅडमी सुरू केल्यानंतर दोन वर्ष झाली असतील. सूर्यकुमारचे आई-वडील सूर्याला घेऊन आमच्याकडे आले. आमच्या मुलाला क्रिकेट खेळण्याची आवड आहे. त्याला क्रिकेट शिकवाल काय, असा प्रश्न केला. मी म्हटलं ठीक आहे. सोडा त्याला आमच्याकडे. त्याचवेळी ‘एमसीए’चे 14 वर्षांखालील क्रिकेट टीमचे सिलेक्शन लागले होते. त्यावेळी आमच्याकडे धवल कुलकर्णी, आदित्य तरे, बलविंदर जुनिअर सारखे सूर्यापेक्षा तीन वर्षे सिनिअर प्लेयर्स प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण घेत होते. सूर्याला तयार करण्याच्या उद्देशाने त्याला सिनिअर प्लेयर्सबरोबर शिबिरात सराव करायला लावला आणि त्याचे फळ आज आम्हाला दिसत आहे.
अशोक आस्वलकर मूळचे मालवण तालुक्यातील कालावलचे. बालपणापासूनच क्रिकेटची फार आवड. त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. मात्र, गावाशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. मालवणच्या प्ले बॉईजमधून अनेक वर्ष खेळले. जसदनवाला ट्रॉफीसाठीही ते संघात होते. क्रिकेट कोचिंगमध्ये त्यांनी 35 व्या वर्षी पदार्पण केले. चेंबूर ट्रॉम्बे येथील बीएआरसी कॉलनीत त्यांनी मुलांना क्रिकेटचे धडे देण्यास सुऊवात केली. ते वर्ष होतं 2004. सध्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ज्याची सर्वाधिक चर्चा झाली, त्या सूर्यकुमार यादव यानेदेखील आस्वलकर यांच्याच हाताखाली
प्रशिक्षण घेण्यास सुऊवात केली. तो त्यावेळी नऊ ते दहा वर्षांचा होता. त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कोचिंग प्रोसेसमधून 16, 19 वर्षाखालील टीम, रणजी ट्रॉफी, आयपीएलमध्ये केकेआर, मुंबई अशा संघातून सूर्यकुमार यादव पुढे आला. आयपीएल सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादव याची कॅडबरी जाहिरात झळकत होती. त्यात अशोक आस्वलकर यांनाही झळकण्याची संधी मिळाली. हा क्षण माझ्यासाठी खूप आनंददायी असल्याचे ते सांगतात. ही जाहिरात परळच्या राजकमल स्टुडिओमध्ये शूट करण्यात आली. आस्वलकर सांगतात, क्रिकेट हा एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा खेळ आहे. क्रिकेट समजायला आयुष्य पुरत नाही. कारण त्यात यश मिळवायला खूप मेहनत करावी लागते. आपल्यात एक्स्ट्रा ऑर्डिनरी गुण असावे लागतात. केवळ संघात निवड होणे म्हणजे तुम्ही यशस्वी झालात हे समजून चालणार नाही. कारण क्रिकेट तुम्हाला खूप काही शिकवते. तुमच्यात सकारात्मक बदल घडविते. तुमच्यातील खिलाडूवृत्ती जागवते. त्यामुळे मी आजकालच्या मुलांना सांगतो की, तुम्ही खूप पॉझिटिव्हली खेळा.
आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये मुलांचा ओढा वाढतोय. पण त्यामागे या क्षेत्रात असलेला पैसा हेच कारण आहे. मी स्वत: टेनिसबॉल क्रिकेट लहानपणी खेळत होतो. क्युरेटर असल्याने मीच मैदान बनवायचो. त्यावेळपासून मी बारकाईने निरीक्षण करायला लागलो. त्यातून माझ्यात बदल घडले. मालवणसारख्या शहरातून चांगले क्रिकेटर्स घडावेत, यासाठी अलिकडेच एक प्रशिक्षण घेतले. ऑफ सिझनमध्येही 50-50 मुले वेगवेगळ्या तालुक्यातून आले होते. मुलांना त्यांच्यातील गुण हेरून प्रशिक्षण देणे हा खूप वेगळा आणि चांगला अनुभव असतो. तो मी आजवर घेत आलोय. चेंबूरच्या बीएआरसी कॉलनीमधील प्रशिक्षणातून असे अनेक खेळाडू घडले. त्यांनी आपापल्या क्षेत्रात यश मिळविले. सूर्यकुमार यादव याने टी 20 वर्ल्ड कप चषकात एक अप्रतिम झेल घेतला. तो सारेच लक्षात ठेवतील. मीही हा क्षण कधीच विसरू शकणार नाही. कारण त्याला मी लहानपणापासून पाहतोय. 19 वर्षांखालील वर्ल्डकप इंडिया खेळलेला ओपनर दिव्यांश सक्सेना हा देखील माझाच खेळाडू, असेही आस्वलकर यांनी सांगितले.
-मनोज चव्हाण









