Sindhudurg Forest Division II with 35 medals in Kolhapur Forest Divisional Sports Competition
वन अकादमी कुंडल येथे झालेल्या कोल्हापूर वनवृत्त स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सिंधुदूर्ग वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी कौतुकास्पद कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रत्येकी १४ सुवर्ण व रौप्य तसेच ७ रजत अशी एकूण ३५ पदके पटकावून कोल्हापूर विभागात द्वितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेत कोलगावचे वनरक्षक ब्रह्मकुमार भोजने हे ॲथलेटिक्सचा राजा या मानाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. तर इन्सुली वनरक्षक संग्राम पाटील तसेच कुडाळ आंबेरी नाका येथील ५९ वर्षीय वनमजूर गोविंद सावंत यांनी प्रत्येकी ६ पदके मिळवत मॅन ऑफ द टूर्नामेंट हा किताब मिळवला.
अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या या कोल्हापूर वन विभागीय क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील सहा वनविभाग सहभागी झाले होते. या स्पर्धेत सर्व विभागाचे सुमारे खुला गट, वेटरन, सीनियर विटरन, व महिला गट मिळून ३०० वन अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
या सर्व पदक विजेत्या खेळाडूंना सिंधुदूर्ग जिल्हा उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांच्याहस्ते प्रशस्त पत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच राज्यस्तरावर वनसंरक्षणाचे कामाकरीता रजत पदक वेंगुर्ला मठ येथील वनपाल सावळा कांबळे यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी सहायक वनसंरक्षक स बा सोनवडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे, मदन क्षीरसागर, अमित कटके, अरुण कन्नमवार राजेंद्र घुणकीकर, विद्या घोडके आदी उपस्थित होते.
ओटवणे प्रतिनिधी









