वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमध्ये 11 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतून भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने स्नायू दुखापतीमुळे माघार घेतली आहे. सिंधूच्या माघारीमुळे भारतीय बॅडमिंटन संघाला मोठा धक्का बसला आहे.
सदर स्पर्धा चीनमधील क्विंगदाओ येथे 11 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय बॅडमिंटन संघातील खेळाडू गुहाटीमध्ये सध्या सराव करीत आहेत. या सराव शिबिरात सिंधू, लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनीही या शिबिरात सरावावर अधिक भर दिला. पी.व्ही. सिंधूने यापूर्वी झालेल्या आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. मात्र तिला सध्या स्नायू दुखापतीची समस्या सुरु झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या दुखापतीचे स्कॅनिंग करण्यात आले त्यावेळी तिला आणखी काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. 2022 च्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर सिंधूला वारंवार दुखापतीने चांगलेच दमविले आहे.









