उन्नतीचा गिल्मूरला धक्का, पांडा भगिनी पराभूत
वृत्तसंस्था/ चँगझाऊ, चीन
दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूने चायना ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेची आश्वासक सुरुवात करताना जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असणाऱ्या जपानच्या टोमोका मियाझाकीला पराभवाचा धक्का दिला. याशिवाय उन्नती हुडा व सात्विक साईराज-चिराग शेट्टी यांनीही विजयी सलामी दिली.
माजी वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या सिंधूने 18 वर्षीय मियाझाकीवर 21-15, 8-21, 21-17 अशी चुरशीच्या लढतीत मात करीत दुसरी फेरी गाठली. 62 मिनिटे ही लढत रंगली होती. मियाझाकी ही 2022 मधील ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन आहे. सिंधूची मियाझाकीविरुद्ध ही दुसरी लढत होती. गेल्या वर्षी स्विस ओपन स्पर्धेत सिंधू तिच्याकडून पराभूत झाली होती. गेल्याच आठवड्यात झालेल्या जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत सिंधू पहिल्याच फेरीत पराभूत झाली होती. या वर्षात पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची तिची ती पाचवी वेळ होती. त्यामुळे स्पर्धेची विजयी सुरुवात केल्याने सिंधूने आनंद व्यक्त केला. या विजयाने नैतिक बळ आणि आत्मविश्वास मिळण्यास मदत होईल, असे ती म्हणाली. तिची पुढील लढत आपल्याच देशाची युवा खेळाडू उन्नती हुडाशी होईल.
उन्नतीने आतापर्यंत दोन सुपर 100 स्पर्धा जिंकल्या आहेत. 17 वर्षीय उन्नतीने 2022 मध्ये ओडिशा मास्टर्स व 2023 मध्ये अबु धाबी मास्टर्स स्पर्धा ज्ंिाकल्या आहेत. येथे तिने स्कॉटलंडच्या दोन वेळा राष्ट्रकुल पदक जिंकणाऱ्या किर्स्टी गिल्मूरचा धक्कादायक पराभव केला. केवळ 36 मिनिटांत तिने गिल्मूरचा 21-11, 21-16 असा फडशा पाडत दुसरी फेरी गाठली.
पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असणाऱ्या भारताच्या सात्विक साईराज रनकिरे•ाr व चिराग शेट्टी यांनीही विजयी सलामी देताना जपानच्या केन्या मित्सुहाशी-हिरोकी ओकामुरा यांच्यावर केवळ 31 मिनिटांत 21-13, 21-9 अशी मात केली. आशियाई क्रीडा स्पर्धेत जेतेपद मिळविलेल्या सात्विक-चिराग यांची पुढील लढत लिओ रॉली कारनाडो व बगास मौलाना यांच्याशी होणार आहे. भारतीय जोडीने यावर्षी झालेल्या मलेशिया ओपन, इंडिया ओपन व सिंगापूर ओपन स्पर्धांत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. ही मालिका खंडित करण्याचा यावेळी ते प्रयत्न करतील.
महिला दुहेरीत मात्र ऋतुपर्णा व श्वेतपर्णा पांडा या भगिनींना पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. हाँगकाँगच्या एन्गा टिंग यूंग व पुइ लाम यूंग यांनी त्यांच्यावर 21-12, 21-13 अशी केवळ 31 मिनिटांच्या खेळात मात केली.









