हाँगकाँग ओपन बॅडमिंटन : प्रणय, लक्ष्य सेनची विजयी सलामी
वृत्तसंस्था/ हाँगकाँग
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन यांनी शानदार विजय मिळवताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
बुधवारी सिंधूला डेन्मार्कच्या बिगरमानांकित लाईन ख्रिस्तोफेरसनने 58 मिनिटे चाललेल्या लढतीत 21-15, 16-21, 19-21 असे पराभूत केले. सामन्यात सिंधूने शानदार सुरुवात करताना पहिला गेम 21-15 असा सहज जिंकला. यानंतर मात्र दुसऱ्या व तिसऱ्या गेममध्ये डेन्मार्कच्या युवा खेळाडूने जबरदस्त कमबॅक केले. ख्रिस्तोफेरसनने दुसरा गेम 16-21 तर तिसरा गेम 19-21 असा जिंकत पुढील फेरी गाठली. विशेष म्हणजे, मागील सहा सामन्यात सिंधूने ख्रिस्तोफेरसनविरुद्ध विजय मिळवला होता. पण, या स्पर्धेत मात्र तिला सलामीच्या सामन्यातच्या तिच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले.
लक्ष्य सेन, प्रणॉयचा शानदार विजय
दुसरीकडे, पुरुष एकेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 34 व्या स्थानी असलेल्या प्रणॉयने चीनच्या लु गुआंगचा 21-17, 21-14 असा पराभव केला. 44 मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणॉयने प्रतिस्पर्धी गुआंगला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. तसेच युवा खेळाडू लक्ष्य सेनने विजयी सलामी देताना तैवानच्या वांग वेईला 22-20, 16-21, 21-15 असे नमवत दुसरी फेरी गाठली. 73 मिनिटे चाललेल्या या रोमांचक सामन्यात लक्ष्यने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत विजय मिळवला. याशिवाय, किरण जॉर्जने देखील सिंगापूरच्या जियांग जेसनला अवघ्या 34 मिनिटांत 21-16, 21-11 असे पराभूत केले आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.









