मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : अश्मा, आकर्षी यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
भारताचे स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू व किदाम्बी श्रीकांत यांनी पहिल्या सामन्यात आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवित मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
सिंधूला येथे सहावे मानांकन मिळाले असून तिला डेन्मार्कच्या लिने ख्रिस्तोफर्सनवर विजय मिळविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. एक तास रंगलेली ही लढत सिंधूने 21-13, 17-13, 21-18 अशी जिंकत 33 व्या मानांकित ख्रिस्तोफर्सनवरील वर्चस्व कायम राखले. याआधी सिंधूने तिच्यावर चारवेळा विजय मिळविला आहे. जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानावर असणाऱ्या सिंधूची पुढील लढत जपानच्या आया ओहोरीशी होईल.
अश्मिता चलिहा व आकर्षी कश्यप या पात्रता फेरीतून आलेल्या भारतीय महिलांना आगेकूच करण्यात यश आले नाही. दोघींनाही सरळ गेम्सनी प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव स्वीकारावा लागला. अश्मिता चौथ्या मानांकित चीनच्या युइ हानकडून 17-21, 7-21 तर आकर्षी जपानच्या अग्रमानांकित अकाने यामागुचीकडून 17-21, 12-21 असे पराभूत झाली.
पुरुष एकेरीत के. श्रीकांतने कौशल्याच्या बळावर विजय मिळवित आगेकूच केली. त्याने टोमा ज्युनियर पोपोव्हवर 21-12, 21-16 अशी मात केली. दुसऱ्या फेरीत त्याची लढत थायलंडच्या आठव्या मानांकित कुनलावत वितिडसर्नशी होईल. सिंधू व श्रीकांत यांच्या कामगिरीने भारतीय चाहते उत्साहित झाले असून त्यांच्या पुढील कामगिरीकडे त्यांचे आता लक्ष लागले आहे.









