ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन : प्रियांशू राजावत, मिथुन मंजुनाथचाही शानदार विजय
वृत्तसंस्था/ सिडनी
येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल खेळाडू पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय, प्रियांशू राजावत, मिथुन मंजुनाथ यांनी शानदार विजयासह दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. लक्ष्य सेनने मात्र दुखापतीमुळे सलामीच्या सामन्यातून माघार घेतली.
बुधवारी झालेल्या सलामीच्या लढतीत भारताचा युवा खेळाडू व 50 व्या मिथुन मंजुनाथने धक्कादायक निकालाची नोंद करताना सिंगापूरचा वर्ल्ड चॅम्पियन लो कीन यूचा 21-19, 21-19 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. 39 मिनिटे चाललेल्या या सामन्यात मंजुनाथने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रतिस्पर्धी ली कीनला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आता, पुढील फेरीत त्याचा सामना मलेशियाच्या ली झी जियाशी होईल.
प्रणॉय, श्रीकांत दुसऱ्या फेरीत
पुरुष एकेरीतील अन्य सामन्यात एचएस प्रणॉयने हाँगकाँगच्या ली च्यूक यूचा 21-18, 16-21, 21-15 असा पराभव केला. ही लढत 51 मिनिटे चालली. आता, दुसऱ्या फेरीत प्रणॉयची लढत चिनी तैपेईच्या यू जेन चीशी होईल. याशिवाय, किदाम्बी श्रीकांतने विजयी प्रारंभ करताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. श्रीकांतने जपानच्या केंटा निशीमोटोला 21-18, 21-7 असे नमवले. पुढील फेरीत त्याचा सामना तैवानच्या ली यांग स्यूविरुद्ध होईल. याशिवाय, प्रियांशू राजावतने ऑस्ट्रेलियाच्या नॅथन तांगला 21-12, 21-16 असे हरवत दुसरी फेरी गाठली आहे. सलामीच्या सामन्यात लक्ष्य सेनने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे भारताच्या किरण जॉर्जला पुढील फेरीत प्रवेश मिळाला आहे.
महिला एकेरीत पीव्ही सिंधूने सलामीच्या सामन्यात शानदार विजयासह दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तिने मायदेशी सहकारी अश्मिताचा 21-18, 21-13 असा अवघ्या 36 मिनिटांत धुव्वा उडवला. आता, पुढील फेरीत तिची लढत भारताच्या आकर्षी कश्यपशी होईल. दुसरीकडे, आकर्षीने मलेशियाच्या गो वेईचा 21-15, 21-17 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.









