ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन : प्रियांशू राजावतचीही आगेकूच, मंजुनाथ, आकर्षी कश्यपचे आव्हान संपुष्टात
वृत्तसंस्था /सिडनी
येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय, प्रियांशू राजावत यांच्यासह पीव्ही सिंधू यांनी शानदार विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. युवा खेळाडू मंजुनाथ, आकर्षी कश्यपचे आव्हान मात्र दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. गुरुवारी झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात किदाम्बी श्रीकांतने आपली विजयी आगेकूच कायम राखताना तैपेईच्या ली यांग स्यूचा 21-10, 21-17 असा पराभव केला. 29 मिनिटे चाललेल्या या सामन्यात श्रीकांतने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. आता, उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना मायदेशी सहकारी प्रियांशू राजावतशी होईल. दुसरीकडे, राजावतनेही विजयी धडाका कायम ठेवताना तैपेईच्या तू वेई वांगला 21-8, 13-21, 21-19 असे नमवले. 59 मिनिटे चाललेल्या या रोमांचक लढतीत राजावतला विजयासाठी चांगलेच परिश्रम घ्यावे लागले. अन्य एका लढतीत प्रणॉयने 74 मिनिटे चाललेल्या संघर्षानंतर विजयाला गवसणी घातली. सहाव्या मानांकित प्रणॉयने तैपेईच्या यू जेन चीला 19-21, 21-19, 21-13 असे हरवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता, प्रणॉयचा सामना इंडोनेशियाचा अव्वल खेळाडू अँथनी गिटिंगशी होईल. अन्य लढतीत भारताचा युवा खेळाडू मंजुनाथला मलेशियाच्या जिया लीकडून 13-21, 21-12, 19-21 असा तर के.जॉर्जला इंडोनेशियाच्या अव्वलमानांकित अँथनी गिटिंगकडून 21-15, 21-18 अशी हार पत्कारावी लागली.
सिंधूची विजयी आगेकूच कायम
महिला एकेरीच्या सामन्यात सिंधूने विजयी आगेकूच कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. तिने अवघ्या 24 मिनिटांत मायदेशी सहकारी आकर्षी कश्यपचा 21-14, 21-10 असा धुव्वा उडवला. या सामन्यात सिंधूने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रतिस्पर्धी आकर्षीला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आता, पुढील फेरीत तिची सामना अमेरिकेच्या बेविन झांगशी होणार आहे. महिला दुहेरीच्या लढतीत मात्र भारताच्या त्रिशा जॉली-गायत्री गोपीचंद यांचे आव्हान दुसऱ्याच फेरीत आटोपले. भारतीय जोडीला जपानच्या जोडीने पराभवाचा धक्का दिला.









