वृत्तसंस्था/ कौन्सिल बल्फ्स (अमेरिका)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे मंगळवारपासून अमेरिकन खुल्या सुपर 300 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ होत आहे. भारताचे बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि पी. व्ही. सिंधू यांचे लक्ष्य या स्पर्धेतील विजेतेपदावर राहिल.
भारताचा पुरुष बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने नुकतेच कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले असल्याने तो आता अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आपली विजयी घौडदौड कायम राखण्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी झालेल्या कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात लक्ष्य सेनने अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्या ली शी फेंगचा पराभव करुन विजेतेपद हस्तगत केले आहे. गेल्या 17 महिन्यांच्या कालावधीत विश्व बॅडमिंटन फेडरेशन टूरवरील लक्ष्य सेनचे हे पहिले विजेतेपद आहे. मंगळवारपासून सुरु होणाऱ्या अमेरिकन बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचा सलामीचा सामना फिनलँडच्या कॅली कोलजोनेन बरोबर होणार आहे. भारताचा साई प्रणित याचा सलामीचा सामना 10 व्या मानांकित फेंगशी होणार आहे.
महिला एकेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूची सलामीची लढत या स्पर्धेतील पात्र ठरणाऱ्या बॅडमिंटनपटूबरोबर होणार आहे. पी. व्ही. सिंधूने 2023 च्या बॅडमिंटन हंगामात अद्याप एकही विजेतेपद मिळविलेले नाही. माद्रीद स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने अंतिम फेरी गाठली होती. तर कॅनडातील स्पर्धेत तिला उपांत्यफेरी पार करता आली नाही. अमेरिकन बॅडमिंटन स्पर्धेत थायलंडच्या माजी विश्व विजेती आर. इंटेनॉनला टॉप सिडिंग देण्यात आले आहे. महिला विभागात भारताची ऋत्विका शिवानी ग•s हिचा सलामीचा सामना चीन तैपेईच्या लिन हेसिंगशी होणार आहे.









