वृत्तसंस्था/हाँगकाँग
पीव्ही सिंधूने गुरुवारी चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिने थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवोंगचा 21-15, 21-15 असा सरळ गेममध्ये पराभव केला. याशिवाय, पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक-चिराग जोडीने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दोन वेळ ऑलिंपिक चॅम्पियन सिंधू, जी सध्या जगात 14 व्या क्रमांकावर आहे, तिने या विजयासह चोचुवोंगविरुद्धचा तिचा हेड-टू-हेड रेकॉर्ड 6-5 असा सुधारला. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना अव्वल मानांकित कोरियाची अन से यंगशी होईल.
हाँगकाँग ओपनमध्ये पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागल्यानंतर चायना मास्टर्समध्ये मात्र तिने शानदार सुरुवात केली आहे. गुरुवारी झालेल्या लढतीत तिने थायलंडच्या पोर्नपावीविरुद्ध पहिल्या गेममध्ये शानदार सुरुवात केली. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळताना तिने पोर्नपावीला जराही वर्चस्वाची संधी दिली नाही. तिने पहिला गेम 21-15 असा जिंकला. यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने 8-0 अशी सुरुवात केली. पोर्नपावीने काही गुण मिळवत तिला टक्कर देण्याचा प्रयत्न केला पण सिंधूने मात्र मोक्याच्या क्षणी गुण मिळवत आपली आघाडी वाढवली. यानंतर तिने हा गेमदेखील 21-15 असा जिंकला व उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. हा सामना 41 मिनिटे चालला.
सात्विक-चिरागचा विजयी धडाका कायम
दुसरीकडे, पुरुष दुहेरीतील भारताची अव्वल मानांकित सात्विक-चिराग जोडीने आपला विजयी धडाका कायम ठेवताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय जोडीने चिनी तैपेईच्या सियांग चिए-वांग ची लिन जोडीचा 21-13, 21-12 असा पराभव केला. 32 मिनिटे चाललेल्या या लडतीत भारतीय जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. आता, त्यांची लढत चीनच्या रेन जियांग-झी हाओनानशी होईल.









