सायना, मालविका, समीर वर्मा पराभूत
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधूला मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विजयासाठी संघर्ष करावा लागला तर सायना नेहवालला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. पुरुष एकेरीत बी. साई प्रणीत व पारुपल्ली कश्यप यांनी विजयी प्रारंभ करीत दुसरी फेरी गाठली तर समीर वर्मा, मालविका बनसोड यांनाही पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला.
सातवे मानांकन मिळालेल्या सिंधूला चीनच्या हे बिंग जियाववर 21-13, 17-21, 21-15 अशी मात करण्यासाठी सुमारे तासभर संघर्ष करावा लागला. गेल्या महिन्यात झालेल्या इंडोनेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत सिंधूला बिंग जियावकडून पराभव पत्करावा लागला होता, त्याची परतफेड सिंधूने या लढतीत केली. बिंग जियाव व सिंधू यांच्यातील लढतीचे रेकॉर्ड 10-9 असे झाले आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविलेल्या सायना नेहवालने एका गेमची आघाडी वाया घालविली आणि तिला दक्षिण कोरियाच्या किम गा यूनकडून 21-16, 17-21, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला. सलग दुसऱया स्पर्धेत सायनाला पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या आठवडय़ात मलेशिया ओपन सुपर 750 स्पर्धेतही ती पहिल्या फेरीत पराभूत झाली होती.
पुरुष एकेरीत बी. साई प्रणीत व पी. कश्यप यांनी दुसरी फेरी गाठली. प्रणीतने ग्वाटेमालाच्या केव्हिन कॉर्डनवर 21-8, 21-9 असा सहज विजय मिळविला. अर्ध्या तासातच त्याने हा सामना संपवला. प्रणीतची पुढील लढत लि शि फेंगशी होईल. पी. कश्यपला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्याने टॉमी सुगियार्तोवर 16-21, 21-16, 21-16 असा विजय मिळविला.
समीर, मालविका पराभूत
समीर वर्माला मात्र पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडावे लागले. चिनी तैपेईच्या चौथ्या मानांकित चौ तिएन चेनने त्याला 10-21, 21-12, 21-14 असे हरविले. महिला एकेरीत मालविका बनसोडही पराभूत झाली. तिला मलेशियाच्या गोह जिन वेईने 21-10, 21-17 असे हरविले.
महिला दुहेरीत त्रीशा जॉली व गायत्री गोपीचंद यांनाही पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. पीयर्ली टॅन व थिनाह मुरलीधरन यांनी त्यांच्यावर 21-14, 21-14 अशी केवळ 33 मिनिटांत मात केली. अश्विनी भट व शिखा गौतम यांनाही युकी फुकुशिमा व सायाका हिरोता यांच्याकडून 21-7, 21-10 तर पूजा दंडू व आरती सारा यांना बल्गेरियाच्या गॅब्रिएला स्टोएव्हा व स्टेफनी स्टोएव्हा यांच्याकडून 21-17, 21-17 असा पराभव स्वीकारावा लागला.









