वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पार्क ताई संग यांनी शेवटी वेगळी वाट पकडली आहे. दक्षिण कोरियाच्या पार्क यांनी शुक्रवारी याची पुष्टी केली आणि तसे करताना अलीकडील सर्व सामन्यांमध्ये सिंधूकडून झालेल्या निराशाजनक कामगिरीची जबाबदारीही स्वीकारली.
राष्ट्रकुलमध्ये खेळताना सिंधूच्या डाव्या पायाला स्ट्रेस प्रॅक्चर झाले होते. पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर यावषी पुनरागमन केलेल्या सिंधूला तिचा फॉर्म पुन्हा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे. मलेशिया ओपन आणि इंडिया ओपनमध्ये ती पहिल्या फेरीत बाहेर पडली आणि दुबईतील आशियाई मिश्र सांघिक स्पर्धेतही ती खालच्या मानांकित खेळाडूंकडून पराभूत झाली.
सिंधूने अलीकडील सर्व सामन्यांमध्ये निराशाजनक खेळ केलेला आहे आणि एक प्रशिक्षक म्हणून यास मी जबाबदार वाटतो. म्हणून तिला बदल हवा होता आणि आपण एक नवीन प्रशिक्षक शोधू, असे तिने सांगितले. मी तिच्या निर्णयाचा आदर करून त्याचे पालन करण्याचे ठरवले. मी पुढील ऑलिम्पिकपर्यंत तिच्यासोबत राहू शकत नाही याचे मला वाईट वाटत आहे. पण आता मी तिला दुरून मार्गदर्शन करेन, असे पार्क म्हणाले. पार्क यांची आधी भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने पुरुष एकेरीतील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्ती केली होती. परंतु 2019 च्या शेवटी त्यांनी सिंधूसोबत काम करण्यास सुरुवात केली. ही भूमिका स्वीकारल्यापासून पार्क यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूने 2022 मध्ये तीन ‘बीएफडब्ल्यू वर्ल्ड टूर विजेतेपदे तसेच राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक प्राप्त केले.









