वृत्तसंस्था/ कॅलगेरी (कॅनडा)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कॅनडा खुल्या सुपर 500 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी अनुक्रमे महिला आणि व पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
महिला एकेरीच्या लढतीमध्ये भारताच्या सिंधूला जपानच्या नासुकी निदेराकडून पुढे चाल मिळाल्याने सिंधूने शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले आहे. जपानच्या निदेराने तंदुरुस्तीच्या समस्येवरून स्पर्धेतून माघार घेतली. पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने ब्राझीलच्या कोलेहोचा 31 मिनिटांच्या कालावधीत 21-15, 21-11 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. पी. व्ही. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना गेओ फेंग जी बरोबर होणार आहे. चीनच्या फेंग जीने या स्पर्धेत आतापर्यंत दर्जेदार कामगिरी केली आहे. तसेच अलीकडेच झालेल्या आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत चीनला विजेतेपद मिळवून देण्यात फेंग जी चे योगदान महत्त्वाचे होते. लक्ष्य सेनचा पुढील सामना बेल्जियमच्या कॅरेगीशी होणार आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या कृष्णप्रसाद गरग आणि विष्णूवर्धन गौर यांना उपउपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला.









