वृत्तसंस्था /कॅलगेरी (कॅनडा)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू झालेल्या कॅनडा खुल्या 2023 च्या सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला एकेरीच्या झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताची पी. व्ही. सिंधूने 62 व्या मानांकित कॅनडाच्या टेलिया एनजीचा 21-16, 21-9 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. आतापर्यंत दोनवेळा ऑलिम्पिक पदक मिळवणारी पी. व्ही. सिंधूचा पुढील फेरीतील सामना जपानच्या नासुकी निदेराशी होणार आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने थायलंडच्या चौथ्या मानांकित कुनलायुत विटीडेसमचा 21-18, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. 2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लक्ष्य सेनने सुवर्णपदक मिळवले होते. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या एका सामन्यात भारताच्या बी. साई प्रणितचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. ब्राझलच्य कोलेहोने साई प्रणितचा 21-12, 21-17 असा पराभव केला. आता लक्ष्य सेन आणि कोलेहो यांच्यात पुढील फेरीचा सामना होईल. महिला एकेरीच्या अन्य एका सामन्यात थायलंडच्या केटीथाँगने भारताच्या ग•s ऋत्वीका शिवानीचा 21-12, 21-3 असा पराभव केला. या स्पर्धेत गेल्या मंगळवारी भारताच्या पी. काश्यपचे आव्हान पात्र फेरीतच समाप्त झाले होते. 2023 च्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या टूर स्पर्धा कार्यक्रमातील कॅनडातील ही स्पर्धा चौथी सुपर 500 दर्जाची आहे.









