वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली महिला बॉक्सर सिमरनजीत कौरने येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये 60 किला वजन गटात अंतिम फेरी गाठली. त्याचप्रमाणे सवीती बोरा (81 किलो गट) व पूजा रानी (75 किलो गट) यांनीही आपापल्या गटातून अंतिम फेरी गाठली आहे.
पंजाबच्या 28 वर्षीय सिमरनजीतने हरियाणाच्या मनीषा मौनचा उपांत्य लढतीत 4-3 अशा गुणांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. ‘माझ्या सर्व लढतीत कठीण होत्या. प्रत्येक लढत मी अंतिम लढत असल्यासारखीच खेळले. विशेषत: ही लढत खूपच अवघड होती. कारण मनीषादेखील विश्व स्पर्धेत पदक मिळविलेले आहे. त्यामुळे तिला हरविणे आवश्यक होते. माझा खेळही या लढतीत चांगला झाला,’ असे सिमरनजीत नंतर म्हणाली. जेतेपदासाठी तिची लढत राष्ट्रकुलमध्ये कांस्य जिंकलेल्या जस्मिन लंबोरियाशी होईल. सेनादलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जस्मिनने हिमाचल प्रदेशच्या मेनका देवीवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवित अंतिम फेरी गाठली.
आसामची अंकुशिता बोरो व सेनादलाची अरुंधती चौधरी यांनीही 66 किलो वजन गटात अंतिम फेरी गाठली असून दोघींमध्ये जेतेपदाची लढत होईल. दोघींनीही उपांत्य फेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर 5-0 याच फरकाने विजय मिळविले. अंकुशिताने हिमाचलच्या दीपिकाचा तर अरुंधतीने नागालँडच्या संजूचा पराभव केला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविलेल्या मंजू रानीला मात्र उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. 48 किलो वजन गटाच्या लढतीत तिला मीनाक्षीकडून एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकणारी रेल्वेची सोनिया लाथेरने 57 किलो वजन गटाची अंतिम फेरी गाठताना पंजाबच्या मनदीप कौरचा 4-1 अशा गुणांनी पराभव केला.









