ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार आपल्या देशात सर्वत्रच कमी अधिक प्रमाणात रोज घडत असतात. असाचा एक प्रकार नुकताच झारखंडमध्ये उघडकीस आला आहे. सिम बॉक्सच्या अस्त्राद्वारे फसवणुकीचा प्रकार घडला आहे. पाहुया काय आहे हा प्रकार.
दररोज ऑनलाइन फसवणूक करणारे, लोकांची फसवणूक करण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. या लोकांनी आता मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क डुप्लिकेट करून फसवणूक सुरू केली आहे. या अनुषंगाने नुकतेच झारखंडची राजधानी रांची येथील कांके येथून सिम बॉक्स आणि काही हजार सिम कार्ड जप्त केले गेले. तसेच हे सिमकार्ड तपासण्यासाठी एटीएसने आयबीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे सिमकार्ड एकाच व्यक्तीच्या नावावर नोंदणी केले गेले आहेत. दुसरे म्हणजे ज्या दोघांना ह्या गुन्हय़ासाठी अटक केले आहे ते तरुण बीसीएचे विद्यार्थी असून ते प्रत्येकी नऊ हजार रुपये पगारावर काम करायचे. ह्यांनी रांचीमधून बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक संदेश पाठवले असल्याचे प्राथमिक तपासामध्ये आढळून आले आहे.
मग नक्की हा सिम बॉक्स काय आहे. तर हे सिम बॉक्स नावाचे टूल किंवा डिव्हाईस आंतरराष्ट्रीय कॉल स्थानिक कॉल्समध्ये रुपांतरीत करते आणि असे कॉल करुन हे स्कॅमर्स आपली फसवणूक करत आहेत. ह्या सिम बॉक्समुळे आंतरराष्ट्रीय कॉलमध्ये स्थानिक क्रमांक दिसतो. एका सिम बॉक्समध्ये 20 ते 500 सिम कार्ड असू शकतात आणि व्हॉईस ओव्हर प्रोटोकॉल (VoIP) गेटवेपर्यंत सपोर्ट करू शकतात. हे कोणत्याही ऑपरेटरला आंतरराष्ट्रीय कॉल दर स्थानिक जीएसम कॉलमध्ये रुपांतर करण्याची परवानगी देते. यामध्ये VoIP चा वापर केला जातो. उदा. असा विचार करा, जर एखाद्या व्यक्तीने ऑस्ट्रेलियामधून कॉल केला आणि तो सिम बॉक्सद्वारे फॉरवर्ड केला गेला असेल, तर तुमच्या फोनवर कदाचित 94ने सुरु होणारा महाराष्ट्रामधील नंबर दिसेल, मात्र तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ऑस्ट्रेलियासाठी +61 कोड दिसणार नाही. हे न दिसण्याचे कारण म्हणजे या सिम बॉक्समध्ये असलेले नोड्स जे डिजिटली मास्क (म्हणजे बदली नंबर देण्याचे काम करतात) केलेला असतो ज्यामुळे मूळ कॉल कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या खऱया नंबरवरून आला आहे, हे उघड होत नाही.फसवणूक करणारे सिम बॉक्स ऍडमिनिस्ट्रेटरचा वापर करून फिशिंग (संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी किंवा रॅन्समवेअरसारखे मालवेअर इन्स्टॉल करण्यासाठी वापरतात) आणि स्मिशिंगसाठी (फसवण्यासाठी एसएमएस द्वारे लिंकचा वापर करतात.) बनवलेले मेसेज पाठवतात. यासाठी ते सिस्टीमच्या एक किंवा अनेक सिमकार्डचे जीएसएम क्रमांक निवडतात आणि नंतर एसएमएस पाठवतात. बऱयाच सायबर सुरक्षा एजन्सी सामान्य व्हिओआयपी कॉल ट्रक करू शकतात मात्र सिम बॉक्सद्वारे केलेले कॉल टेस करणे खूप कठीण जाते. आणि याचाच फायदा स्कॅमर्स सर्वसामान्यांना फसवण्यासाठी फोन किंवा एसएमएस करण्यासाठी करतात. याच तंत्रज्ञानाचा फायदा घेत छोटा राजनने 2017 मध्ये ओरिसात खंडणी मागण्यासाठी अशा कॉलचे एक छोटे एक्सचेंज विकसित केले होते. सध्या मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये WhatsApp कॉलला बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक लोक स्वस्त कॉल करण्यासाठी आणि महागडे नेटवर्क बायपास करण्यासाठी या सिम बॉक्सचा वापर करतात असे आढळून आले आहे. या सिम बॉक्समुळे जिथे नंबर मास्क होतो व खरा नंबर कळत नाही. असे असल्यामुळे हे स्कॅमर्स सामान्य नागरिकांचे बँकेचे तपशील मिळविण्यासाठी याचा वापर करतात. स्कॅमर फिशिंग, स्मिशिंग आणि विशिंग (व्हॉइस फिशिंग) द्वारे तुमच्याशी संपर्क साधून तुमचे बँक तपशील मिळवू शकतात आणि याद्वारे फसवणूक करू शकतात. फिशिंगमध्ये माहिती मिळवण्यासाठी ईमेलचा वापर केला जातो, तर स्मिशिंगमध्ये एसएमएसचा वापर होतो. ह्या सिम बॉक्समधून दररोज हजारो आंतरराष्ट्रीय कॉल फॉरवर्ड केले जातात असे आढळून आले आहे. मात्र ते टेस करणे टेलिकॉम कंपन्यांना खूप कठीण जात आहे. ज्यामुळे टेलीकॉम कंपन्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत तर आहेच पण त्याचबरोबर सामान्य नागरिकांची फसवणूक होऊन त्यांचेही नुकसान होताना दिसत आहे.
टेलिकॉम कंपन्यांना हे सिम बॉक्स एक आव्हान बनले आहे. अहमदाबाद शहर पोलिसांनी अशा चार प्रकरणांचा छडा लावला ज्यामध्ये फसवणूक करण्यासाठी सिम बॉक्सचा वापर करण्यात आला होता. सप्टेंबर 2020मध्ये, पोलिसांनी साबरमती रिव्हर प्रंट या भागातून दोन तरुणांना पोर्टेबल सिम बॉक्ससह अटक केली. त्यांनी हे सिम बॉक्स एक स्कूटरच्या डिक्कीमध्ये बसवला होते आणि वेगवेगळय़ा ठिकाणी जाऊन हे स्पॅम कॉल करत होते. बऱयाचदा ह्या सिम बॉक्समध्ये जे सिम वापरले जाते ते बनावट ओळखपत्रांचा वापर करुन मिळविलेले असते. त्यामुळे आपण आपले ओळखपत्र शक्मयतो हरवू नये किंवा झेरॉक्स सेंटरमध्ये खराब झाले म्हणून ठेवून येऊ नये. तसेच आपल्या फोनवर आलेले मेसेज नीट तपासून घ्यावे. स्कॅमर्स मेसेज पाठविताना शब्दामध्ये बेमालूमपणे बदल करुन पाठवत असतात जो बदल सहज आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे समजा ICICI बँकेने पाठवलेला खरा मेसेज ICICIB असा असेल तर स्कॅमर त्यामध्ये ICICIBK असा बदल करुन पाठवेल. तुम्ही पाहिले तर फक्त `K’ हे अक्षर जादा आहे. हा बदल लक्षात न येण्यासारखा आहे. असेच काहीसे ई-मेल बाबतीत होते. जर एखादा फोन आला तर कृपया आपल्या बँकेच्या अकाऊंटबाबत कोणतीही माहिती देऊ नका. अगदी ते तुमचा पेडीट, डेबीट किंवा अकाऊंट नंबर सांगितला तरी. कारण ह्या सिम बॉक्समुळे खरे फोन कोणते व खोटे फोन कोणते हे चटकन लक्षात येत नाही. आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला ह्याचा सर्वात मोठा धोका आहे. कारण गुन्हेगारांच्या हालचाली ट्रक करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे येऊ शकतात ज्याचा फायदा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार घेऊ शकतात.
– विनायक राजाध्यक्ष








