वृत्तसंस्था/ हर्मोसिलो (मेक्सिको)
कंपाऊंड प्रकारात भारतीय तिरंदाज प्रथमेश जावकरचे त्याच्या पहिल्याच विश्वचषक अंतिम सामन्यात जेतेपद मिळविण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकलेले नसून त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. असे असले, तरी त्याने डेन्मार्कच्या मॅथियास फुलर्टनला जोरदार टक्कर दिली आणि चुरशीच्या ‘शूट-ऑफ फिनिशमध्ये निसटत्या फरकाने तो पराभूत झाला.
शांघाय विश्वचषक विजेता जावकरने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला विद्यमान विजेता माईक श्लोएसरला चार महिन्यांत दुसऱ्यांदा हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याला फुलर्टनकडून 148-148 (10-10) अशी परिस्थिती होऊनही पराभव पत्करावा लागला. कारण फुलर्टनने मारलेला बाण केंद्रस्थानाच्या अधिक जवळ असल्याने त्याला विजयी घोषित करण्यात आले.
डेन्मार्कच्या तिरंदाजाने अंतिम लढतीच्या सुऊवातीच्या फेरीत 20 वर्षीय भारतीय खेळाडूने एक गुण गमावल्यानंतर आघाडी घेतली. सामना मध्यास पोहोचला असता 89-90 असा पिछाडीवर पडलेल्या जावकरने 30 पैकी 30 गुण घेत अंतिम फेरीत प्रवेश करताना गाठली 119-119 अशी बरोबरीची स्थिती निर्माण केली. अंतिम फेरीत दोन्ही तिरंदाजांनी प्रत्येकी 29 गुण मिळविल्याने सामना शूटऑफमध्ये गेला. त्यानंतर टायब्रेकरमध्येही बरोबरीच पाहायला मिळाली.
उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या या तिरंदाजाने संभाव्य 150 पैकी 150 गुण मिळवत श्लोएसरला एका गुणाने (150-149) मागे टाकले होते. या विजयामुळे डच तिरंदाजाला विश्वचषक विजेतेपदाची हॅटट्रिक चुकली. श्लोएसर हा चार विश्वचषक स्पर्धांत (2016, 2019, 2021 आणि 2022) विजेता राहिलेला आहे. मात्र श्लोएसरने कांस्यपदकासाठीच्या लढतीत सूर मिळवत अनुभवी अभिषेक वर्माचा 150-149 असा पराभव करून भारताला दुसरे पदक नाकारले. दुसरीकडे, अदिती स्वामी आणि ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीने महिलांच्या कंपाऊंड विभागात भारताची निराशा केली. सुऊवातीच्या फेरीतील सामने गमावल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.









