आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप ः अंतिम पांघल सुवर्णपदकाच्या फेरीत, चौघीजण कांस्यपदकासाठी लढणार
वृत्तसंस्था/ अस्ताना, कझाकस्तान
आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या निशा दाहिया व प्रिया यांनी आपापल्या गटात अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले तर भारताची युवा मल्ल अंतिम पांघलने सुवर्णपदकाच्या लढतीत प्रवेश मिळविला आहे. भारताला आतापर्यंत या स्पर्धेत सहा पदके मिळाली असून आणखी पाच पदके मिळण्याची अपेक्षा आहे.
68 किलो वजन गटात खेळणाऱया निशाने उपांत्यपूर्व फेरीत मागील वेळच्या कांस्यविजेत्या मंगोलियाच्या डेल्गेर्मा एन्खसैखानवर 10-10 अशी मात केली. गुण समान असले तरी निकषाच्या आधारे निशाला विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर उपांत्य फेरीत पिछाडीवर पडल्यानंतरही तिने आशियाई क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन व ऑलिम्पियन चीनच्या फेंग झोयूवर मात करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत मात्र जपानची युवा मल्ल अमी इशीने शानदार प्रदर्शन करीत निशावर मात करीत सुवर्ण मिळविले आणि निशाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
प्रियाने 76 किलो वजन गटात खेळताना प्रथम चिनी तैपेईच्या हुइ चँगवर 2-1 अशी मात करीत आगेकूच केली. पण उपांत्यपूर्व फेरीत तिला किर्गीझस्तानच्या ऐपेरी किझीकडून पराभव स्वीकारावा लागला. किझीने नंतर अंतिम फेरी गाठल्यामुळे 18 वर्षीय प्रियाला रेपेचेज फेरीत खेळण्याची संधी मिळाली. त्यात कांस्यपदकाच्या लढतीत प्रियाने जपानच्या मिझुकी नागाशिमाचा 2-1 असा पराभव करून कांस्यपदक मिळविले. या दोन पदकानंतर भारताची एकूण पदकसंख्या आता 6 झाली आहे.
आदल्या दिवशी ग्रीको रोमन मल्ल रुपिनने (55 किलो) रौप्य, नीरज (63), विकास (72), सुनील कुमार (87) या तिघांनी कांस्यपदके मिळविली. नीलम (50 किलो), सितो (55), सरिता मोर (59) यांना मात्र पदक मिळविण्यात अपयश आले.
पांघल जेतेपदाच्या फेरीत
महिलांच्या 53 किलो गटात अंतिम पांघलने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखत विजय मिळवून अंतिम फेरी गाठत किमान रौप्य निश्चित केले आहे. अन्शू मलिकला मात्र कांस्यपदकाच्या लढतीत खेळावे लागणार आहे. जपानच्या सइ नान्जोवरविरुद्ध तिला बराच संघर्ष करावा लागला. 18 वर्षीय पांघलने मागील वर्षी यू-20 वर्ल्ड चॅम्पियन बनणारी पहिली भारतीय होण्याचा मान मिळविला होता. तिने अंतिम फेरीपर्यंत एकाही प्रतिस्पर्धीला एकही गुण बहाल केला नाही. फक्त उपांत्य फेरीत तिला ताकीद देण्यात आली होती, एवढा एकच गुण तिने गमविला. उझ्बेकच्या अक्तेंगे केयुनिमजाएव्हाविरुद्धच्या या लढतीत पांघलने 8-1 असा एकतर्फी विजय मिळविला. तिने पहिल्या लढतीत सिंगापूरच्या हसिआओ पिंग अल्विना लिमवर निर्विवाद विजय मिळविल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या लि डेंगवर 6-0 अशी एकतर्फी मात केली. सुवर्णपदकाच्या लढतीत तिचा मुकाबला जपानच्या अकारी फुजिनामीशी होईल. फुजिनामी ही 2021 ची वर्ल्ड चॅम्पियन असून वरिष्ठ स्तरावर खेळायला सुरुवात केल्यानंतर तिने क्वचितच एखादी लढत गमविली आहे.
57 किलो वजन गटात अन्शू मलिकला नान्जोविरुद्ध विजय मिळविताना खूप संघर्ष करावा लागला. नान्जोनेच्या लढतीवर प्रारंभापासून वर्चस्व मिळवले. 30 सेकंदापर्यंत गुण मिळविण्यासाठी कोणतीही हालचाल न केल्यामुळे तिला ताकीद देण्यात आली आणि एका गुणाचा दंडही झाला. दुसऱया फेरीत नान्जोलाही एका गुणाचा दंड झाला. नान्जोने अन्शूच्या डाव्या पायावर ताबा मिळवित जोरात दाबल्यावर अन्शू वेदनेने कळवळली आणि पंचांनी ही लढत लगेच थांबवली. दुखापतीमुळे तिच्या हालचालीवर मर्यादा आल्या आणि नान्जोने 5-1 असा विजय मिळविला. ती फिट असल्यास कांस्यपदकाच्या लढतीत मंगोलियाच्या एर्डेनेसुव्हद बॅट एर्डीनविरुद्ध तिचा मुकाबला होईल. मनीषा (65 किलो), रीतिका (72), सोनम मलिक (62) या देखील कांस्यपदकाच्या लढतीत खेळणार आहेत. सोनमला उपांत्यपूर्व फेरीत ओरखोन पुरवदोर्जकडून पराभव स्वीकारावा लागला. पण तिने अंतिम फेरी गाठल्याने तिने रेपेचेज लढतीत शानदार प्रदर्शन केले आणि कांस्यपदकाच्या लढतीत प्रवेश मिळविला.









