पंतप्रधान मोदी यांच्याकडून भेट, काश्मीरी शालही
वृत्तसंस्था / निकोशिया
सायप्रस या युरोपातील देशाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या देशाच्या ‘प्रथम महिला’ फिलिपा कर्सेरी यांना आंध्र प्रदेशातील कारागिरांनी निर्माण केलेली चांदीची पर्स भेट दिली आहे. तसेच जगप्रसिद्ध काश्मीरी शालही त्यांनी भेट दिली आहे. ही पर्स पारंपरिक धातूकाम आणि आधुनिक डिझाईन यांचा सुरेख संगम आहे. फिलिपा कर्सेरी यांनीही या भेटीचे कौतुक केले आहे.
या चांदीच्या पर्सवर मौल्यवान दगडांचे जडावकामही केलेले आहे. ही धातू कला आंध्र प्रदेशाच्या कारागिरांचे वैशिष्ट्या आहे. या पर्सवर वेलबुट्ट्या आणि फुले यांची नक्षी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्तोडौलीडास यांना काश्मीरी शाल भेट म्हणून दिली. त्यांना सोमवारी सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. सायप्रसच्या दौऱ्यावर त्यांनी त्या देशाचे नेते आणि प्रमुख उद्योगपती यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर व्यापक आणि फलदायी चर्चा केली.
निकोशिया शहराचा फेरफटका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्तोडौलीडास यांच्यासह सायप्रसची राजधानी निकोशिया हे शहर पाहिले. सायप्रसच्या अध्यक्षांनी त्यांना या शहराच्या विशेष भागांची आणि या शहराच्या ऐतिहासिक महत्वाची माहिती दिली. निकोशिया हे शहर दोन हजार वर्षांपासून प्रसिद्ध आहे. हे शहर सायप्रसचे भूषण म्हणून ओळखले जाते. हे शहर स्वत: दाखविल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रसच्या अध्यक्षांचे आभार मानले. भारत आणि सायप्रस यांच्यात अधिक दृढ संबंध प्रस्थापित होणे हे दोन्ही देशांसाठी लाभदायक ठरेल. आपला हा दौरा अत्यंत फलदायी ठरला असून भविष्यात दोन्ही देश एकमेकांच्या अधिक जवळ येतील. दोन्ही देशांच्या जनतेमध्येही आपुलकीचे संबंध प्रस्थापित होतील. दोन्ही देशांमध्ये उत्कट आर्थिक सहकार्यही होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. सायप्रसचा दौरा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाकडे प्रस्थान ठेवले आहे. तेथे ते जी-7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने त्यांचा इतर बलाढ्या देशांच्या नेत्यांशी संवाद घडण्याची शक्यता आहे.









