वृत्तसंस्था/ कैरो
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सोनम मस्करने महिलांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पटकावले. तिची ही पदार्पणाची स्पर्धा आहे.
नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची सोनमची ही पहिलीच वेळ असून तिने आठ महिलांच्या अंतिम फेरीत 252.1 गुण नोंदवले. तिचे सुवर्णपदक अगदी थोडक्यात हुकले. जर्मनीच्या अॅना जॅन्सेनने सोनमपेक्षा केवण् 0.9 गुण जास्त घेत सुवर्ण पटकावले. पोलंडच्या अॅनेटा स्टॅन्कीविझने या प्रकारात कांस्यपदक मिळविले. त्याआधी दिव्यांश सिंग पन्वरने पुरुषांच्या विभागात नवा विश्वविक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताची आणखी एक पदार्पणवीर सिमरनप्रीत कौर ब्रारने पाचवे स्थान मिळविले. वैयक्तिक विभागात या स्तरावर ती प्रथमच खेळत असून पात्रता फेरीत तिने 586 गुण घेत अव्वल स्थान मिळविले होते. जर्मनीची विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन डोरीन व्हेनेकॅम्प व ग्रीसची माजी ऑलिम्पिक चॅम्पियन अॅना कोराकाकी यासारख्या अव्वल नेमबाज असतानाही सिमरनप्रीतने पात्रता फेरीत त्यांना झाकोळून टाकले होते.
अन्य दोन भारतीय रिदम सांगवान व मनू भाकर यांना मात्र अंतिम फेरी गाठता आली नाही. सांगवानने पात्रता फेरीत 582 गुण घेत नववे तर मनूने 580 गुण घेत 14 वे स्थान मिळविले. या प्रकारात डोरीन व अॅना कोराकाकी यांनी सुवर्ण व रौप्यपदक पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी अनुक्रमे 39 व 37 गुण नोंदवले. हंगेरीच्या व्हेरोनिकाने कांस्य मिळविले. भारताने पहिल्या तीन दिवसात 2 सुवर्ण, 3 रौप्यपदके मिळवित या स्पर्धेवर वर्चस्व राखले आहे.









