वृत्तसंस्था/ चेंगवॉंग, कोरिया
येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत भारताचे नेमबाज अर्जुन बबुता आणि तिलोत्तमा सेन यांनी 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात रौप्यपदके मिळवत पुढील वर्षी होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी आपले तिकीट आरक्षीत केले आहे.
या स्पर्धेमध्ये भारताचा 24 वर्षीय नेमबाज अर्जुन बबुताने 10 मी. एअर रायफल पुरुषांच्या सांघिक नेमबाजी प्रकारात दिव्यांश सिंग पनवर आणि रिदॉय हजारिका यांच्या समवेत सुवर्णपदक पटावताना एकूण सरासरी 1892.4 गुणांची नोंद केली. अर्जुन बबुता हा आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा पद्धतीतून पात्र ठरणारा भारताचा नववा नेमबाज आहे.
महिलांच्या 10 मी. एअर रायफल पिस्तूल नेमबाजीत 15 वर्षीय तिलोत्तमा सेनने 252.3 गुणांची नोंद करत रौप्यपदक मिळवले. भारतातर्फे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी तिलोत्तमा ही दहावी नेमबाज आहे. या क्रीडा प्रकारात कोरियाच्या वॉन युनिजीने सुवर्णपदक मिळवताना 252.4 गुणांची नोंद केली. भारताच्या रमिता जिंदालने 230.6 गुणासह कास्यपदक घेतले.
नेमबाजीच्या सांघिक प्रकारात पात्र फेरीतील नोंदवलेल्या गुणांची दखल घेतली जाते. बेबुटाने 633.4, दिव्यानेशने 632.3 तर हजारिकाने 626.7 गुण नोंदवले. भारतीय नेमबाजांनी 1892.4 गुणासह सुवर्णपदक तर या प्रकारात चीनने 1887.3 गुणासह रौप्यपदक तसेच जपानने 1883.6 गुणासह कास्यपदक मिळवले. महिलांच्या 10 मी. एअर रायफल सांघिक प्रकारात तिलोत्तमा, श्रेयांका आणि रमिता यांनी कास्यपदक घेतले.
या स्पर्धेत भारताने वरिष्ठ आणि कनिष्ठांच्या स्किट मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताने 8 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कास्य पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेतील अद्याप पाच दिवस बाकी आहेत.









