वृत्तसंस्था/ अहमदाबाद
रविवारपासून येथे सुरु झालेल्या अकराव्या आशियाई जलतरण चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजने पुरुषांच्या 200 मी. फ्रीस्टाईल प्रकारात रौप्यपदक पटकाविले. इलाईट खंडीय जलतरण स्पर्धेत 16 वर्षानंतर भारतीय जलतरणपटूंनी मिळविलेले हे पहिले पदक आहे.
पुरुषांच्या 200 मी. फ्रीस्टाईल प्रकारात चीनच्या 17 वर्षीय झू हेबोने 1 मिनिट, 46.83 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविले. तर भारताच्या श्रीहरी नटराजने 1 मिनिट, 48.47 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक पटकाविले. 24 वर्षीय श्रीहरी नटराजने यापूर्वी 2020 मधील टोकियो तसेच 2024 मधील पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या क्रीडा प्रकारात जपानच्या हिनाटा अँडोने 1 मिनिट, 48.73 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेत सहभागी झालेला भारताचा आणखी एक जलतरणपटू अनिश गौडाला पात्र फेरीमधील चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. श्रीहरीने 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 9 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक मिळविले होते. अहमदाबादमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत भारताचे 20 पुरुष आणि 20 महिला स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेमधील 29 देशांचे सुमारे 1100 जलतरणपटूंनी भाग घेतला आहे.









