अवघ्या 0.44 सेमीने हुकले सुवर्ण : झेकच्या जेकब वडलेचला गोल्ड
वृत्तसंस्था/ युजीन (अमेरिका)
गोल्डन बॉय म्हणून ओळखला जाणारा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावले. अमेरिकेतल्या यूजीन शहरात झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरजने 83.80 मीटर लांब भाला फेकला. तर चेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेचने 84.24 मीटर दूर भाला फेकून पहिले स्थान पटकावले. अवघ्या 0.44 मीटरच्या फरकाने जेकबने विजेतेपद पटकावलं, तर नीरजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. फिनलँडच्या ऑलिव्हर हेलँडरने 83.74 मीटर भालाफेक केली आणि तिसरे स्थान पटकावले.
नीरजने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असते, तर डायमंड लीग जिंकणारा तो तिसरा खेळाडू ठरला असता पण तसे होऊ शकले नाही. आतापर्यंत झेक प्रजासत्ताकचा वेस्ली (2012, 2013) आणि जेकब वडलेच (2016, 2017) यांनी दोनवेळा जेतेपद पटकावले आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये झुरिच येथे डायमंड लीगची अंतिम फेरी जिंकण्यात नीरजला यश आले होते यंदा मात्र त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
अंतिम फेरीत नीरजकडून निराशा

डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरज पूर्णपणे लयीत दिसला नाही. पहिला फाऊल गेल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात नीरज 83.80 ची सर्वोत्तम कामगिरी करु शकला. तर जेकब वडलेचने पहिल्याच प्रयत्नात 84.1 मीटर अंतर गाठून आघाडी घेतली. यानंतर त्याने सहाव्या प्रयत्नात 84.27 मीटर अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला. यानंतर तिसऱ्या प्रयत्नात नीरजने 81.37 मी भाला फेक केली. चौथा प्रयत्न फाऊल गेल्यानंतर पाचव्या प्रयत्नात त्याने 80.74 तर सहाव्या प्रयत्नात 80.90 मीटर भाला फेकला. दरम्यान, झेकच्या वडलेचने पहिल्या प्रयत्नात शानदार कामगिरी केल्यानंतर सलग तीन त्याचे फाऊल गेले. यानंतर पाचव्या प्रयत्नात त्याने 82.58 तर सहाव्या प्रयत्नात सर्वोत्तम असा 84.24 मीटर भाला फेकत जेतेपदाला गवसणी घातली.
यंदाच्या सत्रात नीरजने डायमंड लीग 2023 मध्ये दमदार कामगिरी केली होती. दोहा डायमंड लीगमध्ये त्याने 88.67 मीटर अंतर पूर्ण केले होते. याशिवाय त्याने ल्युसाने डायमंड लीगमध्ये 87.66 मीटर भाला फेकला होता. यानंतर तो झुरिचमधील डायमंड लीगमध्ये 85.71 मीटर फेकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. यानंतर यूजीन डायमंड लीगच्या अंतिम फेरीत त्याला 83.80 मीटरवर समाधान मानावे लागले. दरम्यान, नीरजच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने त्याचे अभिनंदन केले आहे.
उपजेतेपदानंतर नीरजला मिळाले 10 लाख
दरम्यान, उपविजेत्या नीरजला बक्षीस म्हणून 12,000 डॉलर्स (जवळपास 10 लाख रुपये) इतकी रक्कम मिळाली आहे. याआधी दोहा येथील डायमंड लीग आणि ल्युसाने डायमंड लीग स्पर्धेत विजेतेपदासह नीरजला प्रत्येकी 10,000 डॉलर्स (जवळपास 8.3 लाख रुपये) मिळाले होते.
भाला फेक प्रकारातील अंतिम विजेते –
- जेकब वडलेच (झेक प्रजासत्ताक) – 84.24 मी
- नीरज चोप्रा (भारत) – 83.80 मी
- ऑलिव्हर हेलँडर (फिनलँड) – 83.74 मी.
- एंड्रियन मर्डारे (मोल्डोवा) – 81.79 मीटर
- थॉम्पसन (अमेरिका) – 77.01 मी.









