ओवळीये व कलंबिस्त गावचे सुपुत्र
ओटवणे : प्रतिनिधी
पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पदके
ओवळीये गावचा सुपुत्र ऋतिक सत्यवान सावंत याने सिल्वर पदक पटकावले तर कलंबिस्त गावचा सुपुत्र साहिल रवी पास्ते याने ब्राँझ पदक पटकावले. या यशाबद्दल या दोघांचेही विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशनने महाबळेश्वर पाचगणी येथे एप्रिल महिन्यात आयोजित केलेल्या दहा दिवसीय आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग प्रशिक्षण शिबिरात उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ऋतिक सत्यवान सावंत, साईल पास्ते आणि वेर्ले गावचा सुपुत्र श्रीकृष्ण राजन लिंगवत या तिघांची निवड झाली होती.एक जुलै ते पाच जुलै पर्यंत पंजाब येथे झालेल्या या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत
ऋतिक सावंत ५८ किलो वजन गटातून, साहिल पास्ते ५७ किलो गटातून तर श्रीकृष्ण लिंगवत ५५ किलो वजन गटातून सहभागी झाला होता.
या स्पर्धेमध्ये ऋतिक सावंत याने पहिले चार सामने जिंकून गोल्ड मेडलच्या दिशेने वाटचाल केली होती. मात्र या स्पर्धेदरम्यान त्याच्या बरगड्यांना जबर मार बसल्यामुळे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या फेरीत तो खेळू शकला नाही. त्यामुळे त्याला सिल्वर मेडलवर समाधान मानावे लागले. तर साहिल रवी पास्ते याने दोन सामने जिंकले होते . मात्र ,अटीतटीच्या सेमी फायनलमध्ये त्याला हार पत्करावी लागल्यामुळे ब्राँझ पदकावर त्याला समाधान मानावे लागले. तर श्रीकृष्ण लिंगवत याने एक सामना जिंकला परंतु साखळी सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला.









