आशियाई चॅम्पियनशिप : क्लीन व जर्कमध्ये वजन उचलण्यात अपयश
वृत्तसंस्था/ जिन्जू, कोरिया
भारतीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिननुंगाने आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये स्नॅचचे रौप्यपदक मिळविले. पण क्लीक व जर्कमधील तीनही प्रयत्नात तो अपयशी ठरल्याने त्याला ही स्पर्धा पूर्ण करता आली नाही.
2022 मधील राष्ट्रकुल स्पर्धेनंतर जेरेमीने भाग घेतलेली ही पहिलीच स्पर्धा आहे. या प्रकारात एकूण 12 वेटलिफ्टर्सनी भाग घेतला होता आणि फक्त जेरेमीलाच ही स्पर्धा पूर्ण करता आली नाही. 20 वर्षीय जेरेमीला स्नॅचमधील रौप्यपदक मात्र मिळाले. 67 किलो वजन गटात त्याने स्नॅचमध्ये 141 किलो वजन उचलत आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली. क्लीन व जर्कमधील पहिल्या दोन प्रयत्नात त्याला 165 किलो वजन उचलता आले नाही. त्यानंतर वजन वाढवत त्याने 168 किलो केले. पण त्यातही तो अपयशी ठरला.
मांडीला झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर तो प्रथमच या स्पर्धेत सहभागी झाला होता. या दुखापतीमुळे त्याला गेल्या वर्षीची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धाही हुकली होती. स्नॅचमधील पहिल्या प्रयत्नातच तो अपयशी ठरला. त्याला 137 किलो वजन उचलता आले नाही. पण पुढच्या प्रयत्नात त्याने यशस्वी उचल केली. नंतर त्याने 141 किलो वजन उचलत त्यात सुधारणा केली आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीची बरोबरीही केली. ही उचल त्याला रौप्य मिळवून देण्यास पुरेशी ठरली. चीनच्या हे युएजीने एकूण 320 किलो वजन उचलत सुवर्ण, कोरियाच्या ली सांगयेऑनने 314 किलो वजन उचलत रौप्य व उझ्बेकच्या एर्गाशेव्ह अदखामजेनने 312 किलो वजन उचलत कांस्यपदक मिळविले. शनिवारी बिंदियारानी देवीने महिलांच्या 55 किलो वजन गटात रौप्य मिळवित भारताचे पदकाचे खाते उघडले होते.









