वृत्तसंस्था/ मुंबई
काठमांडूमध्ये नुकत्याच झालेल्या आशिया रग्बी अमीरात सेव्हन्स चषक स्पर्धेत भारतीय महिला रग्बी संघाने रौप्यपदक पटकाविले.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत फिलिपिन्सने भारताचा 7-5 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. दरम्यान भारतीय महिला संघाला रौप्यपदकावर समाधान मानावले लागले. या स्पर्धेमध्ये शिखा यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला रग्बी संघाने गुआमचा उपांत्य फेरीत 24-7 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. तत्पूर्वी भारताने या स्पर्धेत लंकेचा 29-10 तर इंडोनेशियाचा 17-10 अशा गुणांनी पराभव केला. ‘रौप्य जिंकणे खास असले तरी भविष्यात या पदकाचा रंग बदण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न असेल. पुढील वेळी आम्ही सुवर्ण जिंकण्यासाठीच प्रयत्न करू,’ अशा भावना कर्णधार शिखाने व्यक्त केल्या. दोन दिवस झालेल्या या स्पर्धेतील भारताच्या कामगिरीचा अभिमान वाटत असल्याचेही तिने सांगितले.