55 टक्के इतका दिला परतावा : गुंतवणूकदार मालामाल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्याला गुंतवणुकीचा विचार करता बरेच जण सोन्याचा विचार करतात. परंतु आता चांदीसुद्धा गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगला परतावा देणारी ठरते आहे. 2025 मध्ये या चांदीच्या म्हणजेच सिल्व्हर ईटीएफने गुंतवणूकदारांना जवळपास 55 टक्के इतका दमदार परतावा दिला असल्याचे दिसून आले आहे. सुरक्षित आणि स्थिर गुंतवणुकीसाठी पर्याय म्हणून चांदीने चांगली कामगिरी नोंदवली आहे.
अशी होते गुंतवणूक
सिल्व्हर ईटीएफ हा एक म्युच्युअल फंडासारखाच गुंतवणुकीचा प्रकार असून शेअरबाजारात समभागाप्रमाणे यात व्यवहार करता येतो. याचे मूल्य थेटपणे चांदीच्या किमतीवर अवलंबून असते. यामध्ये गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष किंवा खरीखुरी चांदी खरेदी करण्याची गरज नसते. ईटीएफ युनिटच्या माध्यमातून चांदीच्या ईटीएफमध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार करता येतो. एखादा समभाग खरेदी विक्रीचा जसा व्यवहार असतो तसाच हा व्यवहार असतो.
यावर्षी दमदार परतावा
2025 मध्ये जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती वाढलेल्या दिसून आल्या. त्यामध्ये चांदीचा दरही वाढीच्या दिशेने सरकत राहिला. सोन्याच्या तेजीसोबत चांदीनेही तेजीची चमक कायम ठेवली आहे. याचाच लाभ सिल्व्हर ईटीएफने गुंतवणूकदारांना यावर्षी आतापर्यंत मिळवून दिला असल्याचे दिसून आले आहे.
चांदीचा वाढता वापर
लंडन आणि इतर जागतिक बाजारांमध्ये चांदीची उपलब्धता कमी झाली आहे. जेव्हा केव्हा एखाद्या गोष्टीची मागणी जास्त किंवा पुरवठा कमी असतो तेव्हा किमती आपसूकच वाढत जातात. कारखान्यांमध्ये चांदीची गरज सोलर पॅनल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्राकरिता मोठ्या प्रमाणात लागत आहे. यामुळेच चांदीच्या किमती उत्तरोत्तर वाढत आहेत, असेही तज्ञांकडून सांगितले जाते. 2025 मध्ये युटीआय सिल्व्हर ईटीएफ, एचडीएफसी सिल्व्हर ईटीएफ आणि अॅक्सिस सिल्व्हर ईटीएफ यासारख्या फंडांनी 31 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे.









