माऊलींच्या अश्वांनी रिंगणातून पाच फेऱ्या मारीत रिंगण सोहळा पूर्ण केले
कोल्हापूर: चित्ती नाही आस…त्याचा पाडुरंग दास
…असे भक्ताचिये घरी… काम न सांगता करी…
अनाथांचा बंधू….अंगी असे हा संबंधू…
तुका म्हणे भावे…देवा सत्ता राबवावें.
यासह अनेक अभंगांची टाळ-मृदंगाच्या तालावर प्रार्थना करत आषाढी एकादशीच्या संध्याकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या मूर्तीची नगरप्रदक्षिणा काढली. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ ट्रस्ट आयोजित नगरप्रदक्षिणेत पहिला दाखल झालेला चांदी रथ आकर्षणाचा भाग ठरला.
नगरप्रदक्षिणेसाठी रथात ठेवलेल्या चांदीच्या पालखीत ज्ञानेश्वरांची मूर्ती, पादुका आणि ज्ञानेश्वरी विराजमान केली होती. दरम्यान, शिवाजी पेठेतील नाथा गोळे तालीम मंडळ चौकात नगरप्रदक्षिणेसाठी चांदीच्या पालखीत ज्ञानेश्वरांची मूर्ती
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या माजी कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते विराजमान केली. यांच्यासह माजी नगरसेवक जयश्री चव्हाण, शुभांगी चव्हाण यांच्या हस्ते रथ व पालखीचे पुजन केले. यावेळी ज्ञानेश्वर माऊली मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब पोवार उपस्थित होते.
नगरप्रदक्षिणेला प्रस्थान करण्यासाठी सहा बैलगाड्या, दिंड्या पताका खांद्यावर घेतलेले वारकरी, मृदंगधारी, वणेकरी, टाळकरी, तुळशा वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, पारंपरिक वाद्ये, विठ्ठल भक्त, भजनी मंडळ व माऊलींचे अश्व असा लवाजमा रथासमोर उभा केला.
सायंकाळी लवाजमा व चांदीचा रथ मिरजकर तिकटीजवळील विठ्ठल मंदिराजवळ, बिनखांबी गणेश मंदिर, महाव्दार रोड, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोडमार्गे जुना राजवाडा परिसरात रिंगण सोहळा संपन्न झाला. माऊलींच्या अश्वांनी रिंगणातून पाच फेऱ्या मारीत रिंगण सोहळा पूर्ण केले.
यानंतर लवाजम्याने भवानी चेंबर मार्गे नगरप्रदक्षिणेसाठी पुन्हा प्रस्थान केले. हा लवाजमा मिरजकर तिकटी, कोळेकर तिकटी, पाण्याचा खजिना, टिंबर मार्केट आदी मार्गावरुन सासने इस्टेट येथे पोहोचला. येथे रात्री प्रवचनकार एम. पी. पाटील-कावणेकर यांच्या प्रवचन तर आनंदराव लाड महाराज यांच्या कीर्तनाने नगरप्रदक्षिणेची सांगता केली.
कार्यकर्ते व भक्तांनी गाड्या बाजूला केल्या..
नगरप्रदक्षिणेतील लवाजमा जुना राजवाड्यात पोहोचल्यानंतर येथे रिंगण सोहळा झाला. या सोहळ्यापूर्वी राजवाड्याच्या परिसरात वाहने लावण्यास मनाई करावी, अशा संदर्भातील पत्र पोलिसांना दिले होते. परंतू पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
याचवेळी श्रीमंत संभाजीराजे सोशल फाऊंडेशनचे उदय बोंद्रे व कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवत राजवाड्यात लावलेले कित्येक गाड्या बाजूला करून रिंगण सोहळ्यासाठी आवश्यक जागा करून दिली.








