‘चॅम्पियन्स ट्रॉफी’च्या विजेतेपदानंतर जास्त चर्चा झालीय ती रोहितचं नेतृत्व, विराटच्या खेळी आणि गौतम गंभीरचे डावपेच यांचीच…त्यांनी जरी मोलाचा वाटा उचलेला असला, तरी या संघातील यष्टीरक्षक-फलंदाज के. एल. राहुलची उपस्थितीही किती उपयुक्त ठरलीय त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये…कर्नाटकाच्या या 32 वर्षीय ‘सायलंट वॉरियर’नं या स्पर्धेत दाखवून दिलं ते संयमानं आव्हानांना सामोरं जाण्याचं कौशल्य नि कोणत्याही परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी करण्याचं तंत्र…
भारतीय क्रिकेट संघ अगदी ठासून भरलाय तो अनेक चमकणाऱ्या ताऱ्यांनी आणि त्यात समावेश आहे ‘त्याचा’ देखील…शांत, प्रकाशझोतात राहणं फारसं पसंत न करणारा आणि कित्येकदा टीकेला तोंड देणारा असा खेळाडू…कर्णधार रोहित शर्मानं चॅम्पियन्स चषक स्पर्धा जिंकल्यानंतर सांघिक कामगिरीचं कौतुक केलेलं असलं, तरी त्यानं ‘सायलंट वॉरियर’ म्हणून निवड केलीय ती ‘त्याच’ खेळाडूची. रोहितच्या मते, ‘त्यानं’ संघाला दिशा दाखविण्याचं काम छान पद्धतीनं पार पाडलंय…विशेष म्हणजे ‘त्याला’ स्थान मिळालं ते प्रशिक्षक गौतम गंभीरच्या अफलातून डावपेचामुळं. त्यांनी ‘त्याला’ यष्टीरक्षक म्हणून संधी दिली ती रिषभ पंतसारख्या खेळाडूला बाहेर बसवून अन् ‘त्यानं’ सुद्धा त्यांची निराशा केली नाही…नाव : के. एल. राहुल…
चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील प्रत्येक लढतीत त्यानं दबावाला तोंड देण्याचं काम यशस्वीरीत्या पार पाडलं…पाकिस्तानविरुद्ध राहुलला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. पण बांगलादेशविरुद्ध 47 चेंडूंत नाबाद 41, न्यूझीलंडविरुद्ध 29 चेंडूंत 23, उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 34 चेंडूंत नाबाद 42 नि अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 33 चेंडूंत नाबाद 34 अशा खेळी करत त्यानं 140 धावांच्या सरासरीनं जमविल्या त्या एकूण 140 धावा…या कामगिरीमुळंच ‘आयसीसी’नं निवडलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंच्या चमूत त्याला यष्टीरक्षक म्हणून स्थान देण्यात आलंय…
राहुलच्या फलंदाजीत झालेला सर्वांत मोठा बदल म्हणजे फिरकी गोलंदाजांना खेळण्याची त्याची पद्धत. सध्या तो पायांच्या व्यवस्थित हालचाली करत त्यांच्याविरुद्ध आक्रमक फटक्यांचं दर्शन छान पद्धतीनं घडवितोय. त्यानं न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात कर्णधार सँटनरला षटकार खेचताना दाखवून दिली ती हीच सुधारणा…उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियावर भारतानं विजय मिळविल्यानंतर गौतम गंभीरना एका पत्रकारानं प्रश्न विचारला होता तो पंतला वगळण्यासंबंधी…त्यावर भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले की, के. एल. राहुलची एकदिवसीय लढतीत सरासरी जवळपास 50 असून हेच माझं उत्तर…
अंतिम लढत संपल्यानंतर हार्दिक पंड्यानं त्याच्या संयमाचं भरभरून कौतुक केलं ते अप्रतिम, शांत, एकाग्रचित्तानं फलंदाजी करणारा वगैरे शब्दांच्या साहाय्यानं…पंड्या म्हणाला, ‘त्यानं योग्य वेळी मिळालेल्या संधीचा फायदा घेतलाय. आम्ही राहुलला ओळखतोय तो त्यासाठीच. त्याच्यात गुणवत्ता अगदी ठासून भरलीय अन् मला वाटतंय की, त्याच्याजवळ प्रत्येक फटका सुंदर पद्धतीनं खेळण्याची जशी ताकद आहे तशी ती इतरांजवळ नाहीये. अंतिम सामना म्हणजे त्याच्या दर्जाचं प्रदर्शनच होतं’…
भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या मते, गेल्या अनेक वर्षांपासून के. एल. राहुल आव्हानांना यशस्वीरीत्या तोंड देतोय. ‘त्याच्या स्पर्धेतील फलंदाजीनं मला भरपूर आनंद दिलाय. प्रत्येक वेळी 70-80 धावा काढण्याची गरज नाहीये. कारण मोक्याच्या वेळी केलेल्या 30-40 धावाही अत्यंत मौल्यवान ठरतात. त्यानं ‘ड्रेसिंग रूम’लाही दबावाच्या वेळी शांत ठेवण्याची कला आत्मसात केलीय’, रोहितचे शब्द…या स्तुतीच्या वर्षावावर राहुलनं म्हटलंय, ‘क्रिकेट हा सांघिक खेळ आणि मला माझ्या प्रशिक्षकांनी नेहमीच शिकविलंय ते दिलेली भूमिका संघाच्या गरजेचा विचार करून योग्य रीतीनं पार पाडण्याचं. कठीण परिस्थितीतही जबाबदारी स्वीकारून वाट शोधणं अत्यंत महत्त्वाचं. एखाद्या ‘आयसीसी’ स्पर्धेचं जेतेपद सहज मिळत नाहीये. माझ्या कारकिर्दीतील हे पहिलंच अन् त्यामुळं मी जणू चंद्रावरच पोहोचलोय’…
या यशानं के. एल. राहुलवर 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम फेरीनंतर बसलेला ‘खलनायका’चा शिक्का पुसून टाकलाय असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. दुबईत जेव्हा जेव्हा राहुल फलंदाजीसाठी उतरला तेव्हा तेव्हा 19 नोव्हेंबर, 2023 च्या त्या आठवणी त्याच्या मनात दाटून आल्याशिवाय राहिलेल्या नसतील. दुबईसारख्याच परिस्थितीत त्यानं त्यावेळी केली होती ती 107 चेंडूत 66 धावांची खेळी. फटकेबाजी करायची की, फक्त टिकून राहायचं या संभ्रमात सापडल्याचा तो परिणाम. त्यानंतर फटकेबाजीचं तंत्र सुधारण्यासाठी भरपूर घाम गाळल्याचं त्यानं मान्य केलंय…
कसोटी सामन्यांत के. एल. राहुलला कधी सलामीवीराची भूमिका बजवावी लागलीय, तर कधी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागलीय. थोडक्यात गरज असेल त्याप्रमाणं त्याचं खेळण्याचं स्थान बदलत राहिलंय…मधल्या फळीत धडपडावं लागल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या मध्यास त्याला वगळण्यात आलं, परंतु ऑस्ट्रेलियात परत सलामीला नि तिसऱ्या क्रमांकावर पाठविलं गेलं. तर एका महिन्यानंतर इंग्लंडविऊद्धच्या एकदिवसीय सामन्यांवेळी रवानगी करण्यात आली ती सहाव्या क्रमांकावर. या स्थानावर खरं तर त्यानं त्यापूर्वी नियमित फलंदाजी केलेली नव्हती…
मूळचा सलामीवीर असलेला राहुल 2020 पासून एकदिवसीय सामन्यांत फलंदाजी करत आला होता तो पाचव्या क्रमांकावर. रिषभ पंत दुखापतीतून परतलेला असूनही त्यानं पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून आपलं स्थान कायम राखण्यात यश मिळविलेलं असलं, तरी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत पुन्हा त्याला सहाव्या क्रमांकावर ढकलण्यात आलं ते मधल्या फळीत अक्षर पटेलला संधी मिळावी या हेतूनं…हा डावपेच कामी आला तो या बदलांना पुरून उरत राहुलनं आपल्यावरील जबाबदारी चोखपणे निभावल्यानं !
मेहनत नि संयमाचं फळ…
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात के. एल. राहुलनं विराट कोहलीला स्पष्ट सल्ला दिला तो संयमानं खेळण्याचा, पण विराटला नि त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या हार्दिक पंड्यालाही ते जमलं नाही. राहुलनं मात्र एका बाजूनं किल्ला यशस्वीरीत्या लढविला अन् संघ अंतिम फेरीत पोहोचणार याची काळजी घेतली…
- अंतिम सामन्यातही अक्षर पटेलनं आक्रमक पद्धतीनं फलंदाजी करण्याच्या नादात लाँग-ऑफला झेल दिल्यानंतर पुन्हा एकदा राहुलनं जबाबदारीनं फलंदाजी करत 34 धावा काढल्या. विशेष म्हणजे त्यानं आवश्यक धावांची सरासरी फारशी वाढणार नाही याचीही दक्षता घेतली…
- राहुल म्हणतोय, ‘गरज असते ती सामन्यापूर्वी जोरदार तयारी करण्याची. विश्रांती घेताना देखील विचार डोक्यात घोळतात ते डावपेचांचेच. सहाव्या क्रमांकावरील यशस्वी फलंदाजांचं विश्लेषण केल्यास माझी भूमिका कळून चुकेल’…
- अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी इतर साथीदारांपेक्षा त्यानं जास्त सराव केला आणि तो खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणार असल्यानं चतुराईनं वापर केला तो जुन्या चेंडूचा. शिवाय त्या दिवशी त्यानं मोठे फटके हाणण्यावरही भर दिला…
‘आयसीसी’ स्पर्धेत भारतीयांमध्ये अव्वल सरासरी…
- के. एल. राहुलची चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील सरासरी ही ‘आयसीसी’च्या मर्यादित षटकांच्या स्पर्धांचा विचार करता भारतीय खेळाडूंमधील सर्वाधिक…त्यानं याबाबतीत मागं टाकलंय ते विराट कोहलीला, तर त्याच्याआधी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका स्पर्धेत सर्वोत्तम सरासरी होती ती मोहम्मद कैफच्या नावावर…
- ‘आयसीसी’ची एक स्पर्धा जमेस धरल्यास जागतिक आघाडीवर राहुलची सरासरी एकंदरित सातव्या क्रमांकाची आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तिसऱ्या क्रमांकाची…सईद अन्वर हा 200 पेक्षा जास्त सरासरी नोंदविलेला एकमेव खेळाडू. पाकिस्तानच्या त्या सलामीवीरानं 2000 च्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या (त्यावेळी नाव होतं ‘आयसीसी नॉकआउट कप’) दोन डावांमध्ये 209 च्या सरासरीनं काढल्या त्या 209 धावा केल्या अन् तो फक्त एकदाच बाद झाला…
– राजू प्रभू









