जिल्हा काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध
बेळगाव : केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जिल्हा काँग्रेसकडून एक दिवसाचे मौन आंदोलन करण्यात आले. येथील आरटीओ सर्कल जवळील काँग्रेस कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाच्या एकतेसाठी व रक्षणासाठी तसेच नागरिकांच्या हक्कासाठी ‘भारत जोडो’ पदयात्रा काढले. या माध्यमातून त्यांनी देशातील जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्यांना मिळणारी लोकप्रियता पाहून भाजप सरकारकडून त्यांच्याविरोधात षड्यंत्र रचले जात आहे. समाजामध्ये त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. त्यांना वारंवार संकटात टाकण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. या धोरणाविरोधात हे आंदोलन असल्याचे नावलगट्टी यांनी सांगितले.
राजकारणाला तीव्र विरोध
राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देशाच्या आर्थिक बाबींसंदर्भात प्रश्न विचारले होते. या प्रश्नांना त्यांच्याकडे उत्तर नव्हते. केंद्र सरकार जनतेसमोर उघडे पडल्याने राहुल गांधी यांच्याविरोधात नको नको ते आरोप करत त्यांना कोंडीत अडकविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे, असे असले तरी आपण काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहोत. भाजपकडून सुरू असलेल्या राजकारणाला आपला तीव्र विरोध आहे. यासाठीच हे मौन आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









