प्रतिनिधी/ बेळगाव
मानवी तस्करी रोखण्यासाठी शनिवारी बेळगावमध्ये जागृती फेरी काढण्यात आली. महिला व बालकल्याण विभाग, मुव्हमेंट इंडिया व त्रिलेट मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मूक फेरी काढून महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्यात आली. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून त्यांना वेश्या व्यवसायामध्ये ढकलले जात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांच्या सीमेवर बेळगाव जिल्हा असल्याने महिलांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी गावोगावी जागृती केली जात आहे.
शनिवारी सकाळी सरदार्स हायस्कूलच्या मैदानावरून मूक जागृती फेरीला सुरुवात झाली. सीपीआय सुलेमान ताशिलदार यांनी झेंडा दाखवून या फेरीला चालना दिली. कॉलेज रोडमार्गे चन्नम्मा चौक, काकतीवेस रोड, शनिवार खूट, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी चौकमार्गे सरदार्स हायस्कूल मैदानावर सांगता झाली. या जागृती फेरीमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. मूक जागृती फेरी असल्याने महिलांनी हातात फलक घेऊन नागरिकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला.









