वृत्तसंस्था /पेशावर
पाकिस्तानात अल्पसंख्याकांना लक्ष्य करत हत्या करण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. पेशावरमध्ये दोन दिवसांमध्ये शिखांवर हल्ल्याची दुसरी घटना समोर आली आहे. यातील एका हल्ल्यात एका शीखधर्मीयाला जीव गमवावा लागला तर दुसरा शीख व्यक्ती गंभीर जखमी आहे. या घटनेची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत (आयएसकेपी) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात पेशावर येथील 34 वर्षीय मनमोहन सिंह यांचा मृत्यू झाला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील याकूत भागात ही घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी मनमोहन सिंह यांच्यावर गोळ्या झाल्या होत्या. यात मनमोहन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी शुक्रवारी पेशावरच्या राशिद गढी भागात शीख दुकानदार तरलोक सिंह यांच्यावर गोळीबार झाला होता. तरलोक यांच्या पायाला गोळी लागली होती, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरलोक यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी आयएसकेपीने स्वीकारली आहे.









