वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
रस्त्यावर तलवार घेऊन नाच करणाऱ्या एका शीख युवकाला अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले आहे. 35 वर्षांचा हा शीख युवक ‘गटका’ नामक पारंपरिक तलवार प्रात्यक्षिक भर रस्त्यात करीत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी या युवकाला अनेकदा ही तलवारबाजी बंद करण्याचा इशारा दिला होता. तथापि, त्याने या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. त्याच्या या तलवारबाजीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने त्याला सुरक्षेच्या कारणास्तव गोळ्या घालण्यात आल्या, असे प्रतिपादन स्थानिक पोलिसांनी केले आहे.
गुपप्रीत सिंग असे या युवकाचे नाव आहे. गटका हा पंजाबचा मैदानी वीऱश्रीयुक्त तलवारबाजीचा खेळ आहे. ही पंजाबची प्राचीन परंपरा आहे. या खेळात तलवार, भाला, ढाली, काठ्या अशी विविध प्रकारची शस्त्रे उपयोगात आणण्यात येतात. या खेळाची प्रात्यक्षिके विशेषत: शीख समाजाचे पारंपरिक धार्मिक उत्सव किंवा सण यांच्यामध्ये साम्tढहिक किंवा व्यक्तीश: केली जातात.
13 जुलैची घटना
ही घटना जवळपास दीड महिन्यांपूर्वी म्हणजे 13 जुलैला घडली आहे. त्या दिवशी हा शीख युवक तलवारीच्या दोन फूट लांबीच्या पात्यासह भर रस्त्यात खेळ करीत होता. काही पादचाऱ्यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना कळविली होती. त्यामुळे पोलिसांनी अनेकदा या युवकाला त्याची ही तलवारबाजी थांबविण्याची सूचना केली होती, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, हा युवक थांबला नाही. त्याने स्वत:ची जीभ हातातील तलवारीने कापून घेण्याचा आविर्भाव केला. या प्रयत्नात त्याच्या जीभेला जखमही झाली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांवर फेकली बाटली
पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस जवळ पोहचल्यानंतर त्याने त्याच्या जवळची बाटली पोलिसांवर भिरकावली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याला गोळी घातली. त्याला मारण्याची इच्छा किंवा योजना नव्हती. मात्र, त्याने पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. तसेच आपले भीतीदायक खेळ पुढे चालू ठेवले. त्याला तलवार टाकून पोलिसांच्या आधीन होण्याचीही सूचना करण्यात आली होती. मात्र, त्याने तीही मानण्यास नकार दिल्याने त्याला गोळ्या घालाव्या लागल्या, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेचा व्हिडीओ आता प्रसिद्ध झाल्याने ती प्रकाशात आली आहे.









