प्रतिनिधी/ पुणे
सोलापूरचा जिगरबाज मल्ल सिकंदर शेख याने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला झोळी डावावर चितपट करीत प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरीचा किताब शुक्रवारी पटकावला.
प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 66 वी वरिष्ठ राज्य अजिंक्मयपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडली.
अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरचे पारडे निश्चित जड होते. पण, शिवराज त्याला आव्हान देईल अशी अपेक्षा होती. मात्र, वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराजचा निभाव लागला नाही. लढतीला सुऊवात झाल्यावर अवघ्या 22 सेकंदात सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळविला.विजेत्या सिकंदरला थार गाडी, गदा असे पारितोषिक देण्यात आले. तर उपविजेता शिवराज ट्रॅक्टरचा मानकरी ठरला.
तत्पूर्वी, माती विभागात झालेल्या अंतिम लढतीत पहिल्या फेरीतच सिकंदरने संदीपवर सातत्याने ताबा मिळवत सलग दोन गुणांचा सपाटा लावला आणि दहा गुणांची वसुली करत तांत्रिक वर्चस्वावर विजय मिळवून किताबी लढतीत प्रवेश केला होता. गादी विभागात शिवराज राक्षेने कमालीचा चपळपणा दाखवत हर्षद कोकाटेचा तांत्रिक वर्चस्वावर पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.
पारितोषिक वितरणप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, योगेश दोडके या वेळी उपस्थित होते. विजेत्या सिकंदरला थार गाडी, गदा असे पारितोषिक देण्यात आले. तर उपविजेता शिवराज ट्रॅक्टरचा मानकरी ठरला.









