सांगरूळ / वार्ताहर
येथील राजर्षी शाहू नाळे तालीम मंडळाच्या वतीने उद्या रविवार दिनांक २६ रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. मैदानातील प्रमुख कुस्ती महान भारत केसरी पै. सिकंदर शेख यांची असल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात या कुस्ती बद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे. कुस्तीसाठी कुस्ती शौकिनांची सांभाव्य गर्दी लक्षात घेऊन संयोजकांची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे .
सांगरूळ परिसरात अनेक लहान मोठी कुस्ती मैदाने आयोजित केली जातात .अनेक नामवंत मल्लांच्या प्रेक्षणीय लढती या परिसरातील कुस्ती शौकीनानी अनुभवल्या आहेत. पण यावेळी सिकंदरची कुस्ती असल्यामुळे कुस्ती मैदानाला वेगळे वलय प्राप्त झाले आहे. परिसरात सर्वत्र या कुस्ती मैदानाची चर्चा सुरू आहे .
पैलवान सिकंदर शेख यांनी जोरदार व प्रेक्षणीय कुस्त्या करत संपूर्ण भारतभर धुमाकूळ घातला आसून त्याच्या नावाची जोरदार चर्चा कुस्ती क्षेत्रात सुरू आहे. देशभरात होणाऱ्या विविध मैदानात सिकंदर शेख सातत्याने आक्रमक कुस्त्या करत विजयी होत असल्याने कुस्ती शौकीनाना त्याच्या खेळाची भुरळ पडली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेपासून तर सिकंदरचे नाव घराघरात पोहोचले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सांगरुळ गावात सिकंदरसारख्या देशातील नंबर एकचा पैलवान म्हणून ओळखला जाणाऱ्या मल्लाची प्रथमच कुस्ती होत असल्याने परिसरात मोठे औत्सुक्य निर्माण झाले आहे. कुस्ती मैदानासाठी गर्दी लक्षात घेऊन संयोजक सुशांत नाळे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने होणाऱ्या या कुस्ती मैदानात या मैदानात प्रथम क्रमांकाची शाहू केसरी किताबासाठी महान भारत केसरी सिकंदर शेख विरुद्ध महान भारत केसरी भोला ठाकूर यांच्या होणार आहे .प्रथम क्रमांकांची दुसरी लढत महानभारत केसरी पै माऊली जमदाडे( ता. गंगावेश ) विरुद्ध मुंबई महापौर केसरी भारत मदने यांच्यात होणार असून द्वितीय क्रमांकाची लढत पै .संग्राम पाटील सेनादल ( आमशी ) विरुद्ध पै अरुण बोगार्डे ( मोतीबाग ) राष्ट्रीय विजेता प्रशांत जगताप विरुद्ध अरुण शिदे (मोतिबाग) या प्रमुख लढतीसह शंभरावर चटकदार कुस्त्या होणार आहेत. कुस्ती क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन या मैदानात सन्मानित करण्यात येणार आहे .









