वृत्तसंस्था / मेलबर्न
झिम्बाब्वेचा स्टार अष्टपैलू सिकंदर रझाने 500 हून अधिक धावा व 25 बळी मिळवित टी-20 क्रिकेटच्या इतिहासात कॅलेंडर वर्षात ‘डबल’ साधणारा पहिला अष्टपैलू बनला आहे.
रविवारी भारताविरुद्ध झालेल्या सुपर 12 फेरीतील सामन्यात रझाने हा पराक्रम केला. या सामन्यात त्याने 24 चेंडूत 34 धावा जमविल्या व गोलंदाजीत 18 धावांत 1 बळी मिळविला. मात्र त्याची कामगिरी झिम्बाब्वेला विजय मिळवून देण्यास पुरेशी ठरली नाही.
या वर्षात सिकंदरने 24 सामन्यांतील 23 डावांत 735 धावा 35.00 च्या सरासरीने जमविल्या आहेत. त्यात पाच अर्धशतकांचा समावेश असून 87 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने या धावा 150.92 च्या स्ट्राईक रेटने बनविल्या असून त्याने 17.68 च्या सरासरीने व 6.13 च्या इकॉनॉमी रेटने 25 बळी मिळविले आहेत. आयसीसी अष्टपैलूंच्या मानांकनात तो सध्या सहाव्या क्रमांकावर आहे.









