वक्फ बोर्ड, बाळंतिणींचे मृत्यू, मुडा भूखंड घोटाळा, कोरोना काळातील भ्रष्टाचार ठरणार कळीचे मुद्दे
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवार दि. 9 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी रात्री अनेक मंत्री, आमदार अधिवेशनासाठी बेळगावात दाखल झाले आहेत. वक्फ बोर्ड, सरकारी इस्पितळातील बाळंतिणींची मृत्यू प्रकरणे, मुडामधील भूखंड घोटाळा आदी प्रकरणात सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्षाने केली आहे. सरकारनेही विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी कोरोना काळातील घोटाळ्यांचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. दि. 9 ते 20 डिसेंबरपर्यंत दहा दिवस कामकाज चालणार होते. मंड्या येथे होणाऱ्या अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर 20 ऐवजी 19 डिसेंबर रोजी अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. स्वत: विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षांनी सर्व तयारीची पाहणी केली आहे. चन्नपट्टण, शिग्गाव, संडूर विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयामुळे काँग्रेसचे नेते सध्या खुशीत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून होणारे आरोप तितक्याच ताकदीने परतावण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी तयारी केली आहे.
पहिल्याच दिवशी वक्फ बोर्डच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडण्याची तयारी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केली आहे. याला उत्तर देण्यासाठी भाजपच्या राजवटीत वक्फ बोर्डच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांना नोटिसा धाडल्या याचा तपशील जाहीर करण्याची तयारी काँग्रेसने ठेवली आहे. बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये होणाऱ्या अधिवेशनात उत्तर कर्नाटकाचा विकास, उत्तर कर्नाटकातील पाणी योजनांसह महत्त्वाच्या योजना पूर्ण करण्यासंबंधी चर्चा व्हावी, अशी अपेक्षा विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांच्यासह उत्तर कर्नाटकातील सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली असली तरी गेल्या सहा महिन्यांपासून एकापाठोपाठ एक उघडकीस येत असलेल्या घोटाळ्यांमुळे या अधिवेशनात विकासापेक्षा घोटाळ्यांच्या मुद्द्यावरच अधिक चर्चा होणार, अशी अटकळ आहे.
मुडा भूखंड घोटाळ्याच्या चौकशीत ईडीने महत्त्वाची माहिती उघडकीस आणली आहे. वक्फ बोर्डकडून शेतकरी व हिंदू मठ-मंदिरांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. बळ्ळारी, बेळगावसह राज्यातील विविध सरकारी इस्पितळात बाळंतिणींचा मृत्यू झाला आहे. या सर्व मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यामुळेच विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सोमवारी बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्याशी चर्चा करणार आहेत. कारण एका मुदद्यावर एकाच पक्षाच्या नेत्यांकडून दोन आंदोलने झाली तर पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसणार आहे. यामुळे सर्वजण एकीने लढण्याची सूचना हायकमांडने केली आहे. याचाच परिणाम बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी रविवारी सकाळी आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत वक्फविरोधी आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले.
अधिवेशनात पंधरा विधेयके मांडण्याची तयारी
राज्यपालांचे अधिकार कमी करून ग्रामीण विकास विद्यापीठाची सूत्रे मुख्यमंत्र्यांना देण्यासंबंधी याच अधिवेशनात विधेयक मांडण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात पंधरा विधेयके मांडण्याची तयारी ठेवण्यात आली असून अप्पर कृष्णा प्रकल्प, म्हादई योजना, सुवर्ण विधानसौधला सरकारी कार्यालयांचे स्थलांतर व उत्तर कर्नाटकाच्या विकासावर चर्चा घडवून आणण्यासाठी तयारी झाली असली तरी घोटाळ्यामुळे विकासापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्याचीच शक्यता आहे.
सत्ताधारी काँग्रेसही विरोधकांना उत्तर देणार
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी केलेल्या तयारीला सत्ताधारी काँग्रेसनेही तितक्याच ताकदीने दोन्ही सभागृहात उत्तर देण्याचे ठरविले आहे. कोरोनाच्या काळात औषध खरेदीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशी अहवालात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा व माजी मंत्री बी. श्रीरामुलू यांच्या नावाचा उल्लेख झाला आहे. त्यामुळे या नेत्यांवर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. आमदार मुनिरत्न यांना झालेली अटक, खाण घोटाळ्यात भाजप नेत्यांचा सहभाग, प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र व विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यात उघडपणे सुरू असलेला संघर्ष आदी मुद्द्यांचा उल्लेख करीत भाजपला प्रतिउत्तर देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार आहे.









