अमेरिकेच्या व्यापार शिष्टमंडळाने स्थगित केला भारत दौरा : आयातशुल्काचा मुद्दा कायम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि अमेरिकेदरम्यान आयातशुल्कावरून आर्थिक संबंध कटू होत चालले आहेत. व्यापार करारावर चर्चेसाठी 25-29 ऑगस्टपर्यंत प्रस्तावित अमेरिकन शिष्टमंडळाचा भारत दौरा स्थगित करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या शिष्टमंडळाच्या दौऱ्याची नवी तारीख पुढील काळात जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अमेरिकेचे शिष्टमंडळ दोन्ही देशांदरम्यान व्यापार करारावरील चर्चा नेण्याकरता भारतात येणार होते, द्विपक्षीय व्यापार करार सद्यस्थितीत अमेरिका-भारत संबंधांकरता अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडुन कच्च्या तेलाची आयात करत असल्याचे निमित्त पुढे करत भारतावर 25 टक्के अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर एकूण 50 टक्के आयातशुल्क आकारण्यात येणार आहे.
सहाव्य फेरीतील बैठक
अमेरिका आणि भारतीय शिष्टमंडळादरम्यान व्यापार करारावर सहाव्य फेरीतील चर्चा प्रस्तावित होती. ही चर्चा 27 ऑगस्टपूर्वी होणार असल्याने याचा कालावधीही महत्त्वपूर्ण होता. 27 ऑगस्टपासूनच अमेरिकेचे अतिरिक्त 25 टक्के आयातशुल्क लागू होणार आहे. आता ही चर्चा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतावर अतिरिक्त 25 टक्के आयातशुल्क अमेरिकेकडून लागू करण्यात येणार की नाही या प्रश्नाचे उत्तर मिळणे कठिण ठरले आहे.
पुन्हा ठरणार नवी तारीख
चर्चेची तारीख नव्याने ठरण्याची शक्यता आहे. कराराकरता अमेरिका कृषी डेअरी क्षेत्र खुले करण्याच्या मागणीवर अडून असल्याचे मानले जात आहे. परंतु भारताने अमेरिकेची ही मागणी मान्य करणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. भारतात कोट्यावधी शेतकरी अमेरिकेच्या प्रगत शेतकऱ्यांचा आणि तेथील भरमसाठ अनुदानाशी स्पर्धा करू शकत नसल्याची स्थिती आहे. याचमुळे भारताने अमेरिकेकरता स्वत:चे कृषिक्षेत्र खुले न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अमेरिकेतून दूग्धोत्पादने आयात करण्यासंबंधी भारताच्या काही हरकती आहेत.
दुय्यम शुल्क न लादण्याचे संकेत
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दुय्यम शुल्क न लादण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेने दुय्यम शुल्क लादण्याचा निर्णय घेतला असता तर भारतावर मोठा प्रतिकूल प्रभाव पडला असता अशी भीती व्यक्त होत होती. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबत अलास्का येथे झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी स्वत:च्या भूमिकेला काहीसे शिथिल केले आहे.









