ओल्या कचऱयाची मोठी उत्पत्ती : मात्र भाजीमार्केटचे गांधीनगर येथे स्थलांतर झाल्याने महानगरपालिकेसमोर पेच
प्रतिनिधी /बेळगाव
भाजीमार्केटचे स्थलांतर एपीएमसीमध्ये झाल्यानंतर ओल्या कचऱयाची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात होऊ लागली. त्यामुळे महापालिकेने एपीएमसीमध्ये 5 टन कचऱयापासून वीज निर्मितीचा बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदादेखील मागविण्यात आल्या आहेत. पण एपीएमसीमधील भाजीमार्केट गांधीनगर येथे स्थलांतर झाल्याने बायोगॅस प्रकल्प राबविण्याबाबत मनपासमोर पेच निर्माण झाला आहे.
ओल्या कचऱयापासून बायोगॅस प्रकल्पाद्वारे वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, जागेअभावी हा प्रकल्प राबविण्यात आला नाही. कॅन्टोन्मेंट भाजीमार्केटचे स्थलांतर एपीएमसीमध्ये करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी ओल्या कचऱयाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होऊ लागले. दररोज 10 ते 15 टन कचरा तुरमुरी डेपोमध्ये टाकण्यात येत होता. त्यामुळे या ओल्या कचऱयापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. पाच टन कचऱयापासून बायोगॅसद्वारे वीजनिर्मिती करून उत्पादन होणाऱया विजेचा उपयोग एपीएमसीमधील पथदिपांसाठी वापरण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. प्रकल्प उभारण्याकरिता एपीएमसीने जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने 15 व्या वित्त आयोगातून दीड कोटी निधीची तरतूद करण्यात आली होती. निविदाही मागविण्यात आली आहे. मात्र, एपीएमसीमधील भाजीमार्केट गांधीनगर येथे स्थलांतर झाल्याने एपीएमसी बायोगॅस प्रकल्प राबवून उपयोग काय? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे एपीएमसीमध्ये बायोगॅस प्रकल्प उभारण्याबाबत मनपासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सध्या एपीएमसी भाजीमार्केट येथे कचऱयाचे उत्पादन पूर्णपणे कमी झाले आहे. त्या ठिकाणी कचरा मिळत नसल्याने प्रकल्प बंद पडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे एपीएमसीऐवजी अन्यत्र हा प्रकल्प राबविण्याचा विचार मनपाने चालविला आहे. गांधीनगर परिसरात जागा उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्याचा विचार आहे. गांधीनगर परिसरात बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आल्यास भाजीमार्केट, फूलमार्केट आणि फळमार्केट अशा ठिकाणांचा कचरा बायोगॅससाठी वापरता येणे शक्मय आहे. त्यामुळे मनपाला आता बायोगॅस प्रकल्पासाठी नव्या जागेचा शोध घ्यावा लागेल.









