अत्याधुनिक लढाऊ विमान मिग-29 श्रीनगरमध्ये तैनात : शत्रूराष्ट्रांना चोख प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज
वृत्तसंस्था/ श्रीनगर
भारतीय वायुसेनेने श्रीनगर एअरबेसवर मिग-29 लढाऊ विमानांचा एक ताफा तैनात केला आहे. डिफेंडर ऑफ द नॉर्थ असे संबोधले जाणारे हे स्क्वॉड्रन मिग-21 लढाऊ विमानांच्या स्क्वॉड्रनची जागा घेईल. श्रीनगर हवाईतळ चीन आणि पाकिस्तानच्या जवळ असल्यामुळे येथे मिग-29ची तैनाती महत्त्वाची आहे. ही लढाऊ विमाने आता पाकिस्तान आणि चीनकडून होणारा हल्ला रोखणार असल्याने दोन्ही शत्रूराष्ट्रांची झोप उडाली आहे.
2020 मध्ये गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षानंतर लडाख सेक्टरमध्ये मिग-29 देखील तैनात करण्यात आले होते. लडाखमध्ये चीनकडून भारतीय हवाई क्षेत्राचे उल्लंघन झाल्यास, हे मिग-29 सर्वप्रथम प्रत्युत्तर देईल. मिग-29 मध्ये युद्धादरम्यान शत्रूच्या विमानांना ठप्प करण्याची क्षमता देखील आहे. आता श्रीनगरमध्ये तैनात करण्यात आलेले मिग-29 अद्ययावत आणि सुसज्ज करण्यात आले आहे. यामध्ये लांब पल्ल्यापर्यंत हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, नाइट व्हिजन, हवेतून हवेत इंधन भरणे यासह अनेक नवीन वैशिष्ट्यो जोडण्यात आली आहेत. याशिवाय शत्रूच्या विमानांचे सेन्सर जॅम करण्याची क्षमता मिग-29 मध्ये आहे.
सीमेवर चीन आणि पाकिस्तानच्या चिथावणीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने श्रीनगर विमानतळावर अत्याधुनिक मिग-29 लढाऊ विमानांची तुकडी तैनात केली आहे. एका स्क्वॉड्रनमध्ये सुमारे 16-18 लढाऊ विमाने असतात. भारताचे मिग-29 विमान धोकादायक असून ते पाकिस्तान आणि चीन या दोघांनाही चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे.
1985-90 च्या दरम्यान आणीबाणीमध्ये भारतीय हवाई दलाने मिग-29 चा समावेश केला होता. तत्कालीन सोव्हिएत युनियनमध्ये (सध्याचा रशिया) हे विमान अमेरिकेच्या एफ-16 शी स्पर्धा करण्यासाठी बनवण्यात आले होते. भारतीय हवाई दलाकडे मिग-29 चे तीन स्क्वॉड्रन म्हणजेच सुमारे 50 विमाने आहेत. ही विमाने अपग्रेडेड आवृत्तीतील आहेत. भारतीय नौदल त्यांच्या आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू वाहकावर ‘मिग-29के’चा वापर करते.
मिग-29 विमाने काश्मीर आणि लडाखसारख्या उंच भागात सहज उ•ाण करू शकतात. त्याचा टॉप स्पीड 2,400 किमी प्रतितास आहे आणि शस्त्रे वाहून नेण्यासाठी एकूण 7 हार्डपॉइंट्स देखील देण्यात आले आहेत. याद्वारे शत्रूराष्ट्रांच्या विमानांना सहज लक्ष्य करता येईल. मिग-29 ने कारगिल युद्धातही आपले पराक्रम सिद्ध केले. या विमानांनी पाकिस्तानी घुसखोरांच्या अनेक महत्त्वाच्या भागात बॉम्बफेक केल्यामुळे पाकिस्तानवर विजय मिळवण्यासाठी लष्कराला मोठी मदत झाली होती.









