सैन्य जुंता अन् बंडखोरांदरम्यान चर्चा : चीनच्या सरकारची मध्यस्थी
वृत्तसंस्था /यंगून
म्यानमारमधील गृहयुद्धादरम्यान चीनचे सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. म्यानमारच्या सैन्याने बंडखोरांची आघाडी थ्री ब्रदरहुड अलायन्ससोबत चर्चा केली आहे. या चर्चेत चीनने मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. बंडखोर आणि सैन्य यांच्यात भीषण संघर्ष सुरु असताना आणि देश अनेक तुकड्यांमध्ये विभागला जाण्याचा धोका निर्माण झाला असताना ही चर्चा सुरू झाली आहे. चीनच्या सीमेवर म्यानमारच्या सैन्याने बॉम्बवर्षाव केल्यावर पीएलएने स्वत:च्या तोफा तैनात केल्या आहेत. थ्री ब्रदरहुड अलायन्समध्ये अराकान आर्मी, म्यानमार नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आर्मी आणि तांग नॅशनल लिबरेशन आर्मी सामीलआहे. हे सर्व गट 27 ऑक्टोबरपासून म्यानमारच्या सैन्यावर भीषण हल्ले करत आहेत. यामुळे म्यानमारमध्ये शासन करत असलेल्या सैन्य जुंतासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. म्यानमार आणि चीन सीमेवर जोरदार संघर्ष झाल्याने सीमापार व्यापार ठप्प झाला आहे. याचमुळे चीन आता म्यानमार सरकार आणि बंडखोरांच्या आघाडीदरम्यान मध्यस्थी करत गृहयुद्धावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.
हजारो लोक भारतात दाखल
चीनच्या मदतीने ही चर्चा केली जात आहे. या चर्चेचा उद्देश संकट समाप्त करणे आहे. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत आणखी चर्चा होऊ शकते अशी माहिती म्यानमारच्या सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल जॉ मिन तून यांनी दिली आहे. चीनने यापूर्वीच स्वत:च्या सीमेनजीक युद्धविरामाचे आवाहन केले आहे. बंडखोरांच्या आघाडीत सामील एक समूह म्यानमार नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आर्मी एक महत्त्वपूर्ण सीमावर्ती शहरातून सैन्यसमर्थक गट कोकंग समुहाला हटवू पाहत आहे. म्यानमार नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आर्मीचे लक्ष्य संघटित गुन्हेगारी संपविणे देखील असून यात चिनी गुंतवणूकदार आणि म्यानमारच्या वॉरलॉर्ड्सला फसविणारे गुन्हेगार देखील सामील आहेत. म्यानमारमधील गृहयुद्धामुळे मोठ्या संख्येत लोक विस्थापित झाले असून हजारोंच्या संख्येत शरणार्थी भारतात पोहोचले आहेत. भारताने दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले आहे.









