केंद्रीय गृहमंत्र्यांची राज्यपालांसोबत आढावा : रस्ते खुले करण्याचे निर्देश : ड्रग्ज तस्करीवर नजर ठेवण्याचे आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, इंफाळ
21 महिन्यांनंतर मणिपूरमध्ये परिस्थिती सामान्य होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी राज्यातील परिस्थितीचा आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी रस्ते अडवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गृहमंत्र्यांनी 8 मार्चपासून मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर विनाअडथळा वाहतूक सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अमली पदार्थांच्या तस्करीवर बारीक नजर ठेवण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत.
मणिपूरमध्ये 20 फेब्रुवारीपासून वेगवेगळ्या समुदायांनी 300 हून अधिक शस्त्रs आत्मसमर्पण केली आहेत. 20 फेब्रुवारी रोजी राज्यपालांनी हिंसाचारात लुटलेली शस्त्रs परत करण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी 9 फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला होता. यानंतर 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. राज्यातील राजकीय आणि इतर प्रकारांची अस्थिरता संपविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आता केंद्र सरकार सर्व संबंधितांशी बोलून योग्य तो तोगडा काढणार आहे, अशीही माहिती शहा यांनी दिली आहे.
शस्त्रs जमा करण्याच्या मुदतीत वाढ
मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी दहशतवाद्यांना शस्त्रs समर्पण करण्याची अंतिम मुदत 6 मार्च रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत वाढवली आहे. हिंसाचारात लुटलेली 87 प्रकारची शस्त्रs, दारूगोळा आणि विविध वस्तू लोक स्वेच्छेने आत्मसमर्पण करत आहेत. इंफाळ पूर्व, बिष्णुपूर, थौबल, कांगपोक्पी, जिरीबाम, चुराचंदपूर आणि इंफाळ पश्चिम जिह्यांमध्ये शस्त्रs आत्मसमर्पण करण्यात आली. यामध्ये मैतेई गटाच्या अराम्बाई टेंगोले यांनी आत्मसमर्पण केलेल्या 246 शस्त्रांचा समावेश आहे.
इंफाळ पश्चिम जिल्ह्यातून सर्वाधिक शस्त्रs आत्मसमर्पण करण्यात आली आहेत. यामध्ये मॅगझिनसह 12 सीएमजी, दोन 303 रायफल, दोन एसएलआर रायफल, चार 12 बोर सिंगल बॅरल, एक आयईडी आणि दारूगोळा यांचा समावेश आहे. जिरीबाममध्ये पाच 12 बोर डबल बॅरल, एक 9 मिमी कार्बाइन, मॅगझिन, दारूगोळा आणि ग्रेनेड जमा करण्यात आली आहेत.
हिंसाचाराची पार्श्वभूमी
मणिपूरच्या मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या प्रश्नावरून तेथे 2023 मध्ये प्रचंड हिंसाचाराला प्रारंभ झाला होता. राज्यातील वनवासी जमातींचा मैतेई समाजाला असा दर्जा देण्यास विरोध होता. दोन्ही समाजांमधील शस्त्रसज्ज गट एकमेकांना लक्ष्य करीत होते. मैतेई समाज हा राज्याच्या मध्यभागी असलेल्या सखल प्रदेशात वास्तव्य करत असून कुकी आणि अन्य जमाती या सखल प्रदेशाच्या भोवती असलेल्या डोंगराळ भागांमध्ये वास्तव्य करीत आहेत. या हिंसाचारात दोन वर्षांमध्ये 200 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मैतेई समाज हा प्रामुख्याने हिंदू असून कुकी समाज हा बहुतांशी ख्रिश्चन आहे. त्यामुळे या हिंसाचाराला धार्मिक परिमाणही होते. गेल्या सहा महिन्यांमध्ये हिंसाचाराचे प्रमाण कमी झाले असले तरी, दोन्ही समाजांमध्ये प्रचंड तणाव आहे. त्यामुळे केव्हाही असंतोषाचा भडका उठू शकतो, अशी स्थिती आहे.









