वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी काळामध्ये सिमेंटच्या किंमतीमध्ये 1 ते 3 टक्के घट होण्याची शक्यता क्रिसिल या संघटनेने व्यक्त केली आहे. गेल्या 4 वर्षापासून सिमेंटची मागणी वार्षिक तत्त्वावरती 4 टक्के इतकी वाढीव राहिली आहे.
मागणीमध्ये झालेल्या वाढीमुळे सिमेंटच्या किंमतीही परिणामी वाढलेल्या आहेत. 50 किलो पोत्याची किंमत 391 पर्यंत विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. आगामी काळामध्ये सिमेंटची मागणी जरी वाढलेली राहिली तरी किंमती मात्र काहीशा कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास बांधकाम क्षेत्रासाठी ही बाब दिलासा देणारी ठरणार आहे. बांधकाम खर्चामध्ये सिमेंट हा महत्त्वाचा घटक मानला जातो.
2023 च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्येच सिमेंटच्या किंमतीमध्ये काहीशी नरमाई आली असल्याचे दिसून आले होते. सध्याला सिमेंट विक्रीत विविध कंपन्यांची किंमतीवरुन स्पर्धा सुरु आहे. गेल्या कित्येक वर्षामध्ये पाहता एप्रिल आणि मे या दोन मान्सून पूर्वीच्या महिन्यांमध्ये सिमेंटच्या किंमती वाढलेल्या नाहीत. पण आता किमती कमी होणार आहेत, असे सुतोवाच क्रिसील यांनी केलेले आहे.
आघाडीवरच्या पाच सिमेंट कंपन्यांचा वाटा 55 टक्के इतका मागच्या आर्थिक वर्षात राहिला आहे. कोरोनापूर्व हा वाटा 49 टक्के इतका होता. कोळसा, पेटकोक व डिझेल यांच्या किमतीत आलेल्या नरमाईमुळे सिमेंटच्या किमती कमी होणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.









