सौदी अरेबियाकडून हुती बंडखोरांशी चर्चा ः चीनच्या प्रयत्नांना मोठे यश
वृत्तसंस्था/ सना
येमेनमध्ये 2014 पासून सुरू असलेले गृहयुद्ध संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. शांतता प्रस्थापित करण्याकरता सौदी अरेबिया आणि ओमानच्या एका शिष्टमंडळाने येमेनमधील हुती बंडखोरांसोबत चर्चा केली आहे. दोन्ही गट युद्धविरामासंबंधी करार करणार असल्याचे मानले जात आहे. ही चर्चा मागील महिन्यात सौदी अरेबिया आणि इराण यांच्यात झालेल्या शांतता कराराचे फलित मानले जात आहे. सौदी अरेबिया आणि ओमानच्या शिष्टमंडळाने हुती बंडखोरांचे प्रमुख मेहदी अल मशत यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान येमेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला आहे.

सौदी अरेबिया आणि हुती बंडखोरांदरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नाही. परंतु यातील काही मुद्दे समोर आले आहेत. 9 वर्षांपर्यंत चाललेल्या गृहयुद्धानंतर आता येमेनची पुनउ&भारणी केली जाणार आहे. येमेनमधील शासकीय कर्मचाऱयांना वेतन देण्यात येणार आहे. देशातील सर्व विमानतळे आणि बंदरे पुन्हा खुली केली जातील. राजकीय स्थैर्य निर्माण करण्यासाठी काही बदल केले जाणार आहेत.
येमेनमध्ये 9 वर्षांपासून सुरु असलेले युद्ध जारी ठेवण्यात सौदी अरेबिया आणि इराण यांचाच मुख्य हात होता. येमेनच्या सरकारला सौदी अरेबियाचे समर्थन प्राप्त आहे. तर हुती बंडखोरांना इराणकडून मदत पुरविण्यात येत आहे. अशा स्थितीत इराण अन् सौदी अरेबिया यांच्यात चर्चा होत संबंध सुधारल्यास याचा प्रभाव येमेनमधील गृहयुद्धावर पडणे निश्चित मानले जात होते.
11 मार्च रोजी चीनची राजधानी बीजिंगमध्ये इराण आणि सौदी अरेबिया यांच्यात महत्त्वाचा करार झाला होता. हा करार चीनच्या मध्यस्थीने झाला. 2016 नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांनी स्वतःचे दूतावास पुन्हा सुरू करण्यावर सहमती दर्शविली आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील 7 वर्षांपासूनच संघर्ष कमी झाला आहे. 7 वर्षांपूर्वी सौदी अरेबियाने इराणसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली 32 शिया मुस्लिमांवर खटला चालविला होता. इराणने याप्रकरणी सूड उगविणार असल्याची धमकी दिली होती. यानंतर सौदी अरेबियाने अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप करत इराणच्या तीन नागरिकांना मृत्युदंड दिला होता. यामुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठय़ावर पोहोचले होते. तेव्हा सौदी अरेबियाच्या मदतीसाठी अमेरिकेने धाव घेतली होती.
अमेरिकेत सत्तेवर आल्यावर जो बिडेन यांनी दोन वर्षांत येमन गृहयुद्ध संपविण्याचे आश्वासन दिले होते. बिडेन यांचे हे आश्वासन चीनने पूर्ण केले आहे. शस्त्रास्त्र पुरवठय़ाच्या धोरणामुळे अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. याचाच लाभ घेत चीनने सौदी अरेबिया आणि इराण यांच्यात तडजोड घडवुन आणत येमेन गृहयुद्ध संपविण्याचा मार्ग खुला केला आहे.
2014 मध्ये गृहयुद्धास सुरुवात
येमेनमध्ये 2014 साली गृहयुद्ध सुरू झाले हेते. या गृहयुद्धाचे कारण शिया अन् सुन्नी वाद ठरले होते. येमेनच्या एकूण लोकसंख्येत 35 टक्के हिस्सेदारी शिया समुदायाची आहे, तर 65 टक्के लोकसंख्या सुन्नी समुदायाची आहे. 2014 मध्ये येमेन सरकारचे नेतृत्व अब्दरब्बू मंसूर हादी करत होते. त्या काळात सैन्यात फूट पडत फुटिरवादी हुती दक्षिणेत एकवटले होते. अरब देशांमध्ये वर्चस्व निर्माण करण्याच्या चढाओढीत इराण आणि सौदी अरेबियाने या गृहयुद्धात उडी घेतली होती.









