कामे मिळण्याच्या प्रमाणात घट : जागतिक घडामोडींचा परिणाम
बेळगाव : बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रावर सध्या मंदीचे सावट असल्याने उद्योग जगतातून चिंता व्यक्त केली जात आहे. मोठ्या उद्योगांपेक्षा लहान उद्योगांना मंदीची झळ बसत आहे. याचा थेट परिणाम रोजगारावर होताना दिसत आहे. त्यामुळे बेळगावमधील मायक्रो इंडस्ट्री बंद होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शहराचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. बेळगाव शहर व परिसरात तीन ते चार हजार लघुउद्योग आहेत. काही मायक्रो तर काही मोठे उद्योग आहेत. परंतु, सर्वाधिक उद्योग हे लघुउद्योगांमध्येच मोडतात. फौंड्रीसह वाहनांचे सुटे भाग तसेच इतर यंत्रसामग्री बेळगावमध्ये तयार होते. परंतु, मागील चार महिन्यांत लहान उद्योगांना बाहेरील तसेच देशांतर्गत मागणी कमी झाल्याने काम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे या उद्योगांकडून कामगार कपात केली जात आहे. बँकांचे हप्ते तसेच कामगारांचे पगार देणे उद्योजकांना अशक्य होत असल्याने सरकारने यातून तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.
बेळगावची आर्थिक घडी विस्कटणार?
उद्यमबाग, मच्छे, अनगोळ, मजगाव, नावगे या औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात. सध्या दहा ते बारा हजार कामगार लहान तसेच मोठ्या उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. मोठ्या उद्योगांना अद्याप तितकीशी झळ बसली नसली तरी लहान उद्योगांना मात्र मोठी झळ बसत आहे. त्यामुळे काम मिळण्याच्या संधी कमी होणार आहेत. याचा परिणाम बेळगावच्या आर्थिक विकासावर होणार आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आज उद्योजक घेणार चेंबरची बैठक
बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रात आलेल्या मंदीवर चर्चा करण्यासाठी सोमवार दि. 16 रोजी बेळगावमधील छोटे उद्योजक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सदस्यांची भेट घेणार आहेत. सायंकाळी 5 वाजता चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात चर्चा करून व्यवसायासमोरील अडचणी मांडणार आहेत. यामध्ये सरकारने कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासंदर्भातील चर्चा केली जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
सरकारने तोडगा काढावा
पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने दळणवळण महागले. त्याचबरोबर जागतिक स्तरावरील अस्थिर परिस्थितीमुळे उत्पादनांची मागणी घटत गेली. याचा परिणाम सध्या बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रावर झाल्याचे दिसून येत आहे. मागील चार-पाच महिन्यांपासून औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट आहे. अनेक कारखान्यांमध्ये काम नसल्याने कामगारांना इतर कामे करावी लागत आहेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असल्याने सरकारने वेळीच यावर विचार करणे गरजेचे आहे.
– सुनील तिरोडकर, उद्योजक
नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारा
जागतिक घडामोडींमुळे उद्योग क्षेत्रावर काहीशी मंदी ही आहेच. परंतु, उद्योगांमध्येही आता आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. नवीन टेक्नॉलॉजीचा स्वीकार करून व्यवसाय कसा वाढविता येईल, याचा विचार उद्योजकांना करावा लागणार आहे. सध्या प्रत्येक व्यवसाय-उद्योगात बदल होत असल्याने या बदलांचा उद्योजकांनी सामना करणे आवश्यक आहे.
– संजीव कट्टीशेट्टी, अध्यक्ष, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स









