लंकन राष्ट्रपती भारत दौऱ्यावर : द्विपक्षीय हितसंबंध एकमेकांशी निगडित असल्याची पंतप्रधान मोदींची ग्वाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येत अनेक द्विपक्षीय करारांवर शिक्कामोर्तब केले. शुक्रवार, 21 जुलै रोजी त्यांची नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक झाली. याप्रसंगी श्रीलंकेत ‘युपीआय’चा वापर करण्यासंबंधी नेटवर्क-टू-नेटवर्क करारासह विविध करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच दोन्ही नेत्यांच्या भेटीत व्हिजन डॉक्मयुमेंट स्वीकारण्यात आले. दोन्ही देशांतील लोकांमधील सागरी, हवाई, ऊर्जा आणि एकमेकांशी संपर्क मजबूत करणे आणि पर्यटन, ऊर्जा, व्यापार, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य अधिक घट्ट करणे हा यामागचा उद्देश आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
द्विपक्षीय करारांना मूर्त स्वरुप दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लंकन राष्ट्रपती विक्रमसिंघे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. मी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करतो. आज राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांच्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण केले आहे, त्यानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो, असे मोदी म्हणाले. मागील काही वर्षांपासून श्रीलंकन जनता अनेक आव्हानांचा सामना करत आहे. भारत या संकटाच्या काळात श्रीलंकन लोकांच्या पाठीशी उभा राहिला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि श्रीलंकेची सुरक्षा आणि विकासाचे हित एकमेकांशी निगडित आहेत यावर आमचा विश्वास आहे आणि त्यामुळे एकमेकांची सुरक्षा आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन आम्ही एकत्र काम करणे आवश्यक असल्याचेही मोदी पुढे म्हणाले. श्रीलंका सरकार तामिळींच्या आकांक्षा पूर्ण करेल आणि समानता, न्याय आणि शांतता प्रक्रिया पुढे नेईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक
श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रचंड प्रगती करत असल्याचे प्रतिपादन केले. श्रीलंकेसमोरील आव्हाने आणि आम्ही केलेल्या सुधारणांबाबतही मी पंतप्रधान मोदींना माहिती दिली आहे. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करून ती विकासाच्या मार्गावर नेण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. तसेच भारताकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. गेल्या वर्षभरात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीने श्रीलंकेने अनुभवलेल्या विलक्षण आव्हानांची आणि या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारने अनेक आघाड्यांवर केलेल्या सुधारणा उपायांचीही माहिती त्यांनी दिली.
जवळचे आर्थिक सहकार्य अपेक्षित
श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही माहिती दिली. श्रीलंकन राष्ट्रपतींच्या भारत भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना चालना मिळेल. भारताने श्रीलंकेसोबत घनिष्ठ आर्थिक सहकार्याच्या मुद्यांवर चर्चा केली असून त्यातून जवळचे आर्थिक सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. श्रीलंका हा शेजारी देश असल्याने आमचे अतिशय महत्त्वाचे आणि बहुआयामी संबंध असल्याचे सांगत सुरक्षा, विकास सहकार्य आणि नवीन प्रकल्पांशी संबंधित क्षेत्रांचा संदर्भही त्यांनी दिला.









