दिवाळीची खरेदी एकाच छताखाली : मंगळवारपर्यंत आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता यावी, गृहोद्योग करणाऱ्या महिलांच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळावे, त्यांना बाजारपेठेच्या व्यवस्थापनाचे आकलन व्हावे या हेतूने मिलेनियम गार्डन येथे भरविण्यात आलेल्या ‘बेला बाजार’ला पहिल्याच दिवशी लक्षणीय प्रतिसाद लाभला. बेला ग्रुप म्हणजे बेळगावच्या उद्योजक महिलांतर्फे दि. 7 तारखेपर्यंत हा बाजार भरविण्यात आला आहे.
शनिवारी राजेश्री कवटगीमठ, लक्ष्मी खिलारी, रत्नप्रभा बेल्लद, टी. ए. पालकर, दिलीपकुमार कुरुंदवाडे, साक्षी अर्कसाली, विकास गाडवी, शीतल चिलमी यांच्या हस्ते बेला बाजारचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये 90 हून अधिक स्टॉल्स असून वस्त्रप्रावरणे, गृहसजावटीच्या वस्तू, दिवाळीसाठी लागणारे आकाशकंदील, विविध सजावटीच्या पणत्या, उटणे, तयार रांगोळ्या, रांगोळीचे साचे, पूजा साहित्य, पर्फ्युम्स, साबण याबरोबरच बेडशीट्स, साड्या, सौंदर्य प्रसाधने, कृत्रिम नखे, कलात्मक झुंबर, तोरण, कृत्रिम फुले, मातीची भांडी, स्वयंपाकाची भांडी, पर्स, बॅग, मुखवास, मेहंदी यासह असंख्य वस्तूंचा समावेश आहे.
पाहुण्यांनी बेला बाजारच्या प्रत्येक स्टॉलला आवर्जून भेट देऊन उद्योजक महिलांना प्रोत्साहन दिले. एकल पालकत्व असणाऱ्या असंख्य महिलांनी यामध्ये स्टॉल मांडले आहेत. त्यांच्यामध्ये बेला बाजारमुळे आत्मविश्वास निर्माण झाला आहे. याशिवाय विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलही असून बेला बाजार सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत विनामूल्य खुला आहे.









