फुगडी लोककलेचे जतन करण्यात महत्त्वपूर्ण योगदान
कुडाळ
सामाजिक ,धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि पारंपरिक फुगडी लोककलेचे जतन करण्यात महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या कुडाळ – भैरववाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. नीता श्रीनिवास राऊळ यांना कोल्हापूरचा महाराष्ट्र लोककला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. २९ डिसेंबर रोजी कोल्हापुर येथे होणाऱ्या आई महालक्ष्मी संमेलनात चित्रपट अभिनेते संजय खापरे व उद्योजिका पुनम मोरे यांच्या हस्ते सौ राऊळ यांना सन्मानीत करण्यात येणार आहे,अशी माहिती संमेलनाचे स्वागत अध्यक्ष व निमत्रंक डॉ. बी. एन. खरात व स्वप्नपुर्ती फाउडेशनचे मोहन गोखले यांनी दिली.समृद्धी प्रकाशन, स्वप्नपुर्ती फाउंडेशन ,जिद्द फाउंडेशन, वेद फाउंडेशन, स्वामी इंटरप्रायजेसच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथील शाहु स्मारक भवन येथे आई महालक्ष्मी संमेलन २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळयात विविध क्षेत्रात पुरोगामी विचाराने निस्वार्थ कार्य करणाऱ्याचा सन्मान करण्यात येणार आहे.
सामाजिक, सांस्कृतिक , धार्मिक क्षेत्रामध्ये पारंपरिक लोकसंस्कृतीचे संवर्धन , संगोपन प्रचार – प्रसार करण्याचे महत्वपुर्ण कार्य गेल्या दोन दशकापासुन नीता राऊळ करीत आहेत.आपली कौटुंबिक जबाबदारी आणी गारमेंट व्यवसाय सांभाळत फुगडी या लोककलेच्या माध्यमातुन एक यशस्वी महिला म्हणून आपले नाव कमाविले आहे. फुगडी ही एक महाराष्ट्र व गोवा राज्यातील पारंपरिक लोककला आहे. महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पारंपरिक लोकनृत्यामध्ये याची गणना होते. आजच्या मोबाईलच्या युगात फुगडी ही लोककलाही काळाच्या ओघात लृप्त होत चालली होती. मात्र सौ. राऊळ यांनी या कलेला लोकाक्षय मिळवुन देण्यात सिंहाचा वाटा उचलेला आहे. त्यांनी अनेक अडचणीवर मात करीत श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ (कुडाळ) या नावाने फुगडी मंडळ स्थापन केले. या पारंपारीक लोककलेला आधुनिकतेची जोड देत कोकणातच नव्हे,तर मुंबई , ठाणे, कोल्हापूर, पुणे तसेच गोवा राज्य या ठिकाणी फुगडी या कलेचे अनेक कार्यक्रम करून या कलेचा प्रचार आणि प्रसार केला आहे. सन २०१४ मध्ये झीटीव्ही आयोजित मंगळागौर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित,तर २०१५ मध्ये साम टीव्ही आयोजित फुगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित संपुर्ण महाराष्ट्रचे लक्ष वेधले होते. तसेच राज्यभर वेगवेगळया ठीकाणी झालेल्या एकुण १७७ फुगडी स्पर्धेत सहभागी होवुन १५६ ठीकाणी प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच आजपर्यंत जवळजवळ फुगडी या लोककलेचे जवळजवळ २४०० स्टेज शो सादर करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. या कलेच्या माध्यमातुन स्त्रीभ्रूण हत्या, प्लास्टीक बंदी या विषयावर सामाजिक प्रबोधन करीत आहेत. त्याच्या या कार्याची दखल आणी आदर्श घेत सिधुंदुर्गामध्ये अनेक फुगडी मंडळे उदयास आली. त्यामुळे अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.कोकणची संस्कृती,पारंपरिक लोककला संवर्धन आणी संगोपन, करण्याच्या त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र लोककला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबददल त्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.









